राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपा आणि शिवसेना यांच्या तुटलेल्या युतीवरून अजूनही या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरू असते. त्याचसंदर्भात पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. तसेच, भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

“मन भरकटलं, की माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात”

संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाविषयी विचारणा केली असता संजय राऊतांनी भाजपाला टोला लगावला. “शिवसेनेसोबतची युती आमची ऐतिहासिक चूक होती”, असं मुनगंटीवार म्हणाल्याचं सांगताच राऊत म्हणाले, “माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात. राजकारणात विरोधीपक्ष ज्या पद्धतीने भरकटला आहे, ते पाहाता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार आहात?”, असा खोचक सवाल राऊतांनी विचारला.

“श्रीमान बोम्मईंना आम्ही सांगू इच्छितो की शिवराय नसते, तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनेचा निशाणा!

“सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतली आणि बाहेरची भाषणं मी पाहातो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचं ते ठरवलंय”, असं देखील राऊत म्हणाले.

“भाजपा नेत्यांची मनस्थिती ठीक नाही”

दरम्यान, भाजपा नेत्यांची मनस्थिती ठीक नसल्याचं संजय राऊत यावेळी उपहासाने म्हणाले. “कधी राष्ट्रवादीबरोबर तुम्हाला जावंसं वाटतंय. कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्याचं म्हणता. कधी अजून काय म्हणता. या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना शांतपणे केदारनाथला जाऊन महिनाभर बसण्याची गरज आहे. त्यांची डोकी थंड झाली, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाहीये. त्यांचं मनस्वास्थ्य ठीक व्हावं, म्हणून मी या नवीन वर्षात इश्वराकडे प्रार्थना करतो”, असं राऊत म्हणाले.