महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला मनसेनं विरोध केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. मनसेच्या माध्यमातून भाजपाच सूत्र हलवत आहे का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाकडे स्वत:चं हत्यारच नसल्याची टीका केली आहे. तसेच, मनसेचं नाव न घेता भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून…”

“भाजपा लढण्यासाठी कधीही स्वत:चं हत्यार वापरत नाहीत. त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. खांदेही पिचलेले असतात. खांदेही मजबूत नसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, पण लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी-सीबीआयच्या घोषणा करतात. पण तिथूनही काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला विरोध केला जातो. शिवसेना हा एक हत्ती आहे. हत्ती चालत असतो. पण पाठीमागून कोण भुंकत असतो, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“जे आमच्यावर पाठीमागून असे वार करायला येत आहेत, त्यांनी मर्दासारखं समोर यावं. दुसऱ्यांचे खांदे आणि दुसऱ्यांच्या गंजलेल्या बंदूकांनी आमच्यावर हल्ले करू नका. आम्ही तुम्हाला घाबरत नाहीत”, असा इशारा देखील संजय राऊतांनी यावेळी दिला.

मुंबईतला कष्टकरी कायम शिवसेनेसोबत..

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील भूमिका मांडली आहे. “एसटी कामगारांचा संप जे चिघळवत आहेत, ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा आणि श्रमाचा मुंबईत कायम तिरस्कार वाटला, ते आज कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत रस्त्यावर उतरत आहेत याचं आश्चर्य वाटतंय मला. मुंबईतला कष्टकरी कायम शिवसेनेसोबत राहिला आहे. त्यांना भडकवण्याचे कोणतेही प्रयोग यशस्वी होणार नाहीत. शरद पवार देखील यात लक्ष घालत आहेत. राज ठाकरे देखील याविषयी प्रयत्न करू इच्छित असतील, तर त्यांचं स्वागत आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

“कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं”, भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या विधानावरून शिवसेनेचं टीकास्त्र!

“एसटी कामगारांचा प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून तापलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यावर मत व्यक्त केलं आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घोडं अडलेलं आहे. अनिल परब यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. पण राज्यातल्या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे”, असंही राऊत म्हणाले.