राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अर्थात २०१९पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र निर्माण झालं. सहा महिन्यांपूर्वी ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतरही राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील कलगीतुरा चालूच असल्याचं दिसत आहे. राज्यपालांनी काही ऐतिहासिक व्यक्तींविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर केलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्याजागी कोण येणार? यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
देशपातळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याजागी कुणाची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वर्णी लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: केंद्र सरकारला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील परत बोलावण्याची इच्छा राज्यपालांनी व्यक्त केल्याच्या मुद्द्याला खुद्द देवेंद्र फडणवीसांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नारायण राणे राज्यपाल? राऊत म्हणतात…
दरम्यान, महाराष्ट्राचे भावी राज्यपाल म्हणून अनेक नावं चर्चेत असली, तरी नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तर काय होईल, अशी विचारणा आज ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर संजय राऊतांनी शेवटी फक्त दोन शब्दांत “मजा येईल” असं म्हटलं. त्यामागे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या वादाची दीर्घ पार्श्वभूमी असल्याचंच त्या दोन शब्दांत दिसून आल्याचं बोललं जात आहे.
“साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप तिकडे…”, शरद पवारांचं नाव घेत इम्तियाज जलील यांचा राजेश टोपेंना टोला!
काय म्हणाले संजय राऊत?
यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊतांनी आधी ही शक्यता फेटाळून लावली. “नियम आणि कायदा पाहिला, तर त्या राज्याचा नागरिक हा त्या राज्याचा राज्यपाल होऊच शकत नाही. पण या देशात अनेक घटनाबाह्य गोष्टी होत असतात. असं काही घटनाबाह्य कृत्य होत असेल, तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू. मजा येईल”, असं संजय राऊत म्हणाले.
पिंपरी पोटनिवडणुकीवरून बावनकुळेंना टोला
दरम्यान, यावेळी सध्या चर्चेत असलेल्या पिंपरी पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपाला टोला लगावला आहे. टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोध करणार का? असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “जर-तरच्या गोष्टीला काही अर्थ नाही हे बावनकुळेंना सांगा. टिळक कुटुंबाची मोठी परंपरा आहे. तुम्हाला विधानसभेत, राज्यसभा निवडणुकीत, विधान परिषद निवडणुकीत मतं हवी होती, तेव्हा तुम्ही त्या आजारी महिला आमदारांना स्ट्रेचरवर आणलंत. त्यांचं कौतुक केलंत. आज जेव्हा वेळ आली, तेव्हा तुम्ही त्यांना तिकीट नाकारलंत. तुम्ही तिकीट जाहीर करा ना. मग आम्ही बघू. त्यांची उमेदवारी जाहीर करून अर्ज भरू द्या. उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणीही मागे घेता येतो.”