राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीला सामोरं जावं लागत असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आयात उमेदवारांमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यापुढे त्यांनी चाणाक्षपणे पावलं टाकावीत असा सल्ला प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

भाजपाने कोल्हापुरात उमेदवार उतरवल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “घोडेबाजार करण्यासाठी संभाजीराजेंची…”

ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे. पण तरी देशाचं राजकारण पाहता काँग्रेसने या निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसं पाठवत आहे. याचा परिणाम राज्यातील काँग्रेस पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो”.

Rajyasabha Election : इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसची उमेदवारी ; राज्याबाहेरील नेत्याला राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा कायम

“महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये काही तोलामोलाची माणसं कमी नाहीत. उत्तम माणसं, कार्यकर्ते आहेत. मी फार बोलणं बरं नाही पण छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही तिथेही सर्व उमेदवार बाहेरचे आहेत. याचा परिणाम स्थानिक कार्यकर्त्यांवर होते. फक्त काँग्रेसच नाही तर इतर पक्षातही असे निर्णय घेतले जातात तेव्हा स्थानिक लोक दुखावले जातात. विशेषत: काँग्रेस पक्षाला सर्वांना घेऊन पुढे जाण्याची जास्त गरज आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.

“आम्हाला काँग्रेसची गरज”

“आम्हाला काँग्रेसची गरज आहे. देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं असं सांगणारे आम्ही आहोत. काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसने आपली प्रकृती सुधारावी हे सांगणारे आम्ही आहोत,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफुस

काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी देताना राहुल व प्रियंका गांधी यांच्या विश्वासातील नेत्यांची वर्णी लावल्यामुळे पक्षांत धुसफुस सुरू झाली आहे. पक्षप्रवक्ते पवन खेरा, आचार्य प्रमोद कृष्णम, राजस्थानमधील आमदार संयम लोढा, नगमा अशा अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा दहा उमेदवारांची यादी जाहीर केली.

‘‘कदाचित माझी तपस्या कमी पडली असावी,’’ असे ट्वीट करून पवन खेरा यांनी खदखद व्यक्त केली. राहुल व प्रियंका यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रीय प्रवक्ता व महासचिव रणदीप सुरजेवाला यांनाही राज्यसभेची उमेदवारी दिली गेली आहे. हरियाणातून विधानसभेची पोटनिवडणूक हरणाऱ्या सुरजेवाला यांना हरियाणामधून एक जागा रिक्त होत असतानाही राज्यस्थानमधून वरिष्ठ सभागृहात पाठवले जाणार आहे. खेरा यांनी उमेदवारी मिळालेल्या दहाही नेत्यांचे अभिनंदन केले.

राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन जागा जिंकता येतील, पण या जागांवर प्रदेश नेतृत्वाकडून मागणी करूनदेखील स्थानिक उमेदवार दिला गेला नाही. तिथून सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारींना संधी देण्यात आली आहे. राजस्थानमधील अपक्ष आमदार संयम लोढा यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली असून उदयपूर चिंतन शिबिरानंतरही काँग्रेसमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, लोढा यांनी, ‘‘राजस्थानमधील काँग्रेस नेता वा पदाधिकाऱ्याला राजस्थानमधून उमेदवारी का दिली गेली नाही’’, असा सवाल त्यांनी थेट प्रियंका गांधी-वाड्रा यांना केला आहे.

गुलाम नबी आझाद ,आनंद शर्मा, तारिक अन्वर यांच्या ४० वर्षांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. या ज्येष्ठांना हुतात्मा का केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आझाद, शर्मा यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

नगमा यांची नाराजी

महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या नगमा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. २००३-०४ मध्ये मी काँग्रेसमध्ये आले तेव्हा सोनिया गांधींनी मला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर १८ वर्षे झाली, आता इम्रान यांना पक्षाने उमेदवारी दिली असून मी उमेदवारी मिळवण्यात मी कमी पडले, असे ट्वीट नगमा यांनी केले आहे. प्रियंका यांच्या आग्रहामुळे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते.