scorecardresearch

“…म्हणून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे”, चैत्यभूमीवरुन संजय राऊतांचं मोठं विधान, आंबेडकरांसह प्रबोधनकारांचाही केला उल्लेख

आज बाबासाहेबांची प्रकर्षाने आठवण होत आहे, संजय राऊतांनी भाजपाला केलं लक्ष्य

“…म्हणून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे”, चैत्यभूमीवरुन संजय राऊतांचं मोठं विधान, आंबेडकरांसह प्रबोधनकारांचाही केला उल्लेख
आज बाबासाहेबांची प्रकर्षाने आठवण होत आहे, संजय राऊतांनी भाजपाला केलं लक्ष्य

देशातील प्रत्येक क्षेत्रात आज घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षाने आठवण होत आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे या महाराष्ट्राची दैवतं आहेत. ते आमच्या मनात आहेत. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो महासागर उसळला आहे, त्यातील आम्ही एक आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं की “आम्हाला फक्त आजच त्यांचं स्मरण होत आहे असं नाही. जेव्हा जेव्हा या देशात कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात तेव्हा तेव्हा आम्हाला बाबासाहेबांची घटना आणि कार्य सतत आठवत असतं. आज आम्हाला आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होत आहे. कारण देशातील प्रत्येक क्षेत्रात घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला आंबेडकर आठवत आहेत”.

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजित पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन; म्हणाले, “इंदू मिल येथील स्मारकावरून…”

“महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते. म्हणून आम्हाला आज त्यांचं स्मरण होत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“मुंबईत मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांनी अशाप्रकारे मुंबईवर हल्ले सुरु राहिले तर मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही आणि मुंबईवर मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क आहे असं म्हटलं होतं. आज त्यांच्या या वक्तव्याची आठवण होत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:53 IST

संबंधित बातम्या