scorecardresearch

मोफत लसीकरणाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

मोफत लसीकरणाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

देशात १ मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसतानाही रविवारी मात्र मंत्र्यांमध्ये संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी चढाओढ लागल्यांच चित्र होतं. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केलं. मात्र नंतर हे ट्विट डिलीट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

“हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मोफत लसीकरणावरून मंत्र्यांमध्ये चढाओढ

“करोना संकटाचा सामना धैर्याने केला जात असून मुंबईतही डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत करोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला तरच संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा के ली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच मोफत लस देण्याचा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी जाहिर केले आहे.

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट मागे घेत लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-04-2021 at 11:14 IST

संबंधित बातम्या