सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत असलेल्या ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या चित्रपटावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरु आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करत बदनामीचा कट सुरु असल्याचा आरोप केला असताना दुसरीकडे विरोधक मात्र हा राजकीय अजेंडा असल्याची टीका करत आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना काश्मीर फाईल्सवर बोलताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

“काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवला. गेली ३२ वर्ष हे लोक कुठे होते? हा संवेदनशील विषय असून त्याचं राजकारण करु नये. पाकव्याप्त काश्मीरदेखील भारतात आणत अखंड हिंदुस्थान निर्माण करु असं भाजपाने सांगितलं होतं. यासाठी लोकांनी मोदींनी मतदान केलं होतं. आम्ही त्याची वाट पाहत आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

“काश्मीरमधील काही घटनांवर आधारित चित्रपट आला आहे, तो जर कोणाचा राजकीय अजेंडा ठरत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने त्या काळात काश्मिरी पंडितांची बाजू घेऊन परखड भूमिका स्पष्ट केली होती. काश्मिरी पंडितांना रक्षणासाठी हातात शस्त्र द्या हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी त्यांना विरोध करणारे भाजपाचे नेते होते. बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते होते ज्यांनी अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी देणाऱ्या दहशतवाद्यांना जर एकाच्याही केसाला हात लागला तर हजला जाणारी विमानं उडू देणार नाही सांगितलं होतं. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली होती. त्यामुळे काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून आम्हाला दाखवू नका,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.

“महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के राखीव जागा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. पण आम्ही चित्रपट काढून प्रचार केला नाही, राजकारण केलं नाही. त्यामुळे कोणत्या विषयाचं राजकारण करायचं याचं भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

आम्ही ठाकरे चित्रपट केला होता त्यालाही टॅक्स फ्री करण्याची मागणी आम्ही केली नव्हती. आमच्या भावना काय आहेत हे संपूर्ण देश आणि काश्मिरी पंडितांनाही माहिती आहेत असंही यावेळी ते म्हणाले. तसंच आम्ही अनेकदा काश्मीरला जाऊन आलो आहोत. महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक नेत्याला बोलावून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही फक्त टुरिझमसाठी गेलो नाही. आम्ही लाल चौकातही गेलो होतो, पण त्याचं राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले.