शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी भेटीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना चर्चेवर खुलासा केला आहे.

संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता, राज्यपालांना भेटावं लागेल असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात मध्यावधी निवडणुका? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भेटीवर बोलताना म्हटलं की, “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेत भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार. तर ते दोन ते अडीच तास एकत्र बसले असतील तर चहा बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती”.