नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट

Shivsena, Sanjay Raut, Nagar Panchayat Election Result,
नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट

राज्याच्या ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला़ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली, तर सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी विदर्भाने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. दरम्यान नगरपंचायत निवडणूक निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचं स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढत राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

नगरपंचायतींमध्ये भाजपला सर्वाधिक जागा; राष्ट्रवादीला बळ, शिवसेना चौथ्या क्रमांकावर

“शिवसेना हा प्रामुख्याने शहरी भागातील पक्ष आहे. राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या असतील. मुंबई, ठाणे, पुणे या भागात नगरपंचायती झाल्या नाहीत, पण जिथे झाल्या तिथे शिवसेना लढली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे. पण यापुढील अनेक वर्ष महाविकास आघाडी म्हणूनच बेरीज करावी लागेल,” असं राऊतांनी सांगितलं. “भाजपा नेते काहीही म्हणतील, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे,” असंही ते म्हणाले.

शिवसेनेने बालेकिल्ल्यात पराभव केल्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान, म्हणाले, “भाजपासोबत छुपी…”

नटसम्राट म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “कोणी खूर्ची देतं का खूर्ची…”

“आम्ही महाविकास आघाडी म्हणून निकालाकडे पाहत आहोत. राज्यात एकत्र सरकार चालवताना एकमेकांचं बोट धरुन चालत आहोत, त्यामुळे तसंच पाहावं लागेल. या निवडणुका खूपच तळागाळात होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे उद्या काय होईल या दृष्टीने पाहणं गरजेचं नाही. भाजपासोबत असतानाही असाच निकाल येत होता. पण विधानसभा, लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही यावर गांभीर्याने विचार करतो. स्थानिक निकालावर तेथील नेते बोलतील,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट

नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली. शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत. यापैकी ८० जागा कोकणातील आहेत. शिवसेनेने कोकणात वर्चस्व कायम राखले असले तरी सिंधुदुर्गमध्ये राणे आणि शिवसेनेत नेहमीप्रमाणे रस्सीखेच पाहायला मिळाली. शिवसेनेची विदर्भातील घसरगुंडी या वेळीही कायम राहिली. शिवसेनेचे नेतृत्व मुंबई, ठाण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करते तर राज्याच्या अन्य भागांत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविली जाते. मुख्यमंत्री, नगरविकास ही महत्त्वाची पदे शिवसेनेकडे असतानाही छोट्या शहरांमध्ये शिवसेनेला अपेक्षित कौल मिळालेला नाही.

नगरपंचायतीतील एकूण जागा १६४९

भाजपा – ३८४

राष्ट्रवादी – ३४४

काँग्रेस – ३१६

शिवसेना – २८४

मनसे – ४

अपक्ष – २०६

स्थानिक आघाड्या – ८२

बसपा – ४

माकप – ११

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut on nagar panchayat election result sgy

Next Story
नटसम्राट म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “कोणी खुर्ची देतं का खुर्ची…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी