scorecardresearch

संजय राऊतांकडून मोदींची थेट पुतीन यांच्याशी तुलना; म्हणाले “आपल्या देशात युद्ध नसेल पण…”

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कारवायांवर बोलताना संजय राऊतांची भाजपावर जोरदार टीका

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कारवायांवर बोलताना संजय राऊतांची भाजपावर जोरदार टीका

युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने सध्या जगभरात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचं नाव चर्चेत आहे. अनेक देशांनी या युद्धासाठी पुतीन यांना जबाबदार घरलं असून त्यांच्यावर निर्बंध लावले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट पुतीन यांच्याशी केली आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कारवायांवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत सध्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने नागपुरात असून यावेळी ते एका कार्यक्रमात बोलत होते.

“आपल्या देशात युद्ध नसेल पण आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसले आहेत आणि ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल येत असून आम्ही त्यातून वाचलो आहोत,” असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रावर असे हल्ले करणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.

“ज्या राज्यांमध्ये आपली सरकारं नाहीत त्या राज्याशी अधिक सन्मानानं वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित नेहरुंकडून शिकायला मिळालं. आपल्या विरोधात बोलणारे, विरोधी सूर लावणारे जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांचा अधिक सन्मान करणं ही खरी लोकशाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

संजय राऊतांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. “पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईन. बाजूला बसेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

लढत राहायचे! ; ‘ईडी’च्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणल्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कारवाईबाबत विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे’, असे मार्मिक उत्तर दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनौपचारिक चर्चेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘ईडी’च्या कारवाईबाबत विचारणा केली. ‘‘केंद्राचे सुडाचे राजकारण थांबतच नाही. ‘ईडी’च्या कारवाया वाढतच चालल्या आहेत’’, अशा शब्दांत काही मंत्र्यांनी केंद्रातील भाजप सरकारचे राजकारण व मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवरील कारवाईद्वारे केली जाणारी बदनामी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारांविरोधात लढतच राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut on pm narendra modi russian president vladimir putin sgy

ताज्या बातम्या