एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संप स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र, विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. यामुळे संपाचा तिढा गुंतागुंतीचा बनला असून, महामंडळ संपकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कामगारांना आपल्या कुटुंबाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेत्यांची माघार, संपकऱ्यांचा नकार ; एसटी संप सुरूच : विलीनीकरणाच्या मागणीवर संघटना ठाम

“संप संपायला पाहिजे आणि कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना भरघोस पगारवाढ दिली आहे. विलिनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं हित आहे. जे वकील त्यांना भडकवत आहेत ते त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था काय झाली हे पाहिलं होतं. एसटी कामगारदेखील मराठा बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?

संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “मी राष्ट्रवादीविषयी सांगत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”.

“हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते ते महत्त्वाचं आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जात असून अवहेलना केली जात आहे. त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचं जे ठरवलं आहे त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.