काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधकांच्या एकजुटीची हाक दिली आहे. दिल्लीच्या कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘नाश्ता बैठकी’त १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पेगॅसस, शेती कायदे, इंधन दरवाढ अशा लोकांशी संबंधित मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केलं. या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतदेखील सहभागी झाले होते. बैठकीत राहुल गांधींच्या शेजारी बसलेल्या संजय राऊत यांचा एक फोटो नंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोत राहुल गांधी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या फोटोवर भाष्य केलं आहे.

विरोधकांना एकीची साद
“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” संजय राऊतांनी राज्यपालांना दिला इशारा

संजय राऊत यांना या व्हायरल फोटोसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्ष नाही तर मनंही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावलं पडत असतील तर लोक स्वागत करतील”.

दरम्यान बैठकीत शेजारची जागा दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “राज्यात आणि देशाच्या राजकारणात शिवसेनेला नेहमीच मानाचं स्थान मिळालं आहे. राहुल गांधी आणि माझी सातत्याने चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे”.

राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल

“राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार ज्याने घटनेनुसार शपथ घेतली आहे त्यांची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील किंवा एमपीएमसीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणी इतर असतं. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. “राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं. पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल,” असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “राज्यपालांना कोणी हस्तक्षेप करायला लावत आहे का हे पहावं लागेल. जी कामं मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहेत त्यात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलेलं मी ऐकलं. हे घटनाविरोधी आहे. राज्यपालांना कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी गाव स्तरावर दौरे काढण्याची गरज नाही. इतर राज्यांमध्येही पूर आले आहेत. पण भाजपाशासित इतर राज्यांमध्ये राज्यपाल दौरे काढताना दिसत नाहीत. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राज्यपाल असं का वागत आहेत हे समजेल किंवा असं वागण्यास का प्रवृत्त केलं जात आहे”.

“राज्यपालांचं काम मर्यादित स्वरुपातील आहे. त्यांनी कॅबिनेटच्या शिफारसी, निर्णयांचं पालन करावं तसंच सरकारच्या कामात हस्तक्षेप करु नये असं घटनेत आहे. त्यांनी हे नियम पाळलं तर बरं पडेल,” अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

नारायण राणेंकडे मागणी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात छोट्या उद्योगांचं मोठं नुकसान झालं असून नारायण राणे यांच्याकडे यासंबंधी खातं आहे यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्ही आधीच मागणी केली आहे. महाड किंवा इतर मोठे उद्योग असणाऱ्या ठिकाणी औद्योगिक विभागाला फटका बसला आहे. हे सर्व भाग महाराष्ट्रासह देशालाही मोठा महसूल मिळवून देतात. त्यासंदर्भात केंद्राने वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. त्यातील बराचसा महसूल केंद्राला जात असतो”.