आपल्या देशात सध्या राजकारणाचा जो खेळखंडोबा सुरू आहे, तो पाहता सुजाण जनतेची मती कुंठीत झाली आहे. लोकांना भडकवणे, त्यांना पेटवापेटवी करण्यास प्रवृत्त करणे हेच राजकारण असे आपल्या नेत्यांना वाटत आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना ‘रोखठोक’मधून केली आहे. जगात सर्वाधिक बेरोजगार असलेल्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतात व त्या नात्याने ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वावरतात तेव्हा आश्चर्य वाटते असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“आंध्र प्रदेशात पिनिपे विश्वरूप या परिवहन मंत्र्याचे घरच संतप्त लोकांनी जाळून टाकले. कारण काय? नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा जिल्हय़ाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असे नाव केले. त्यामुळे लोक भडकले व मंत्र्याचे घर जाळले. या संपूर्ण भागात हिंसाचार व जाळपोळ सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास इतका विरोध व्हावा याचे मला आश्चर्य वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देश उभा आहे व त्यांच्या नावास विरोध व्हावा हे आश्चर्य आहे. देशाची नवी पिढी कोणत्या दिशेने निघाली आहे? एरवी विश्वाला मार्गदर्शन करणारे पंतप्रधान मोदी अशा वेळी मौन बाळगतात याचे आश्चर्य वाटते,” असं संजय राऊत म्हणाले.

“एखाद्या शहराचे नामांतर करण्याचे अधिकार केंद्राचे असतात. प्रस्ताव केंद्राकडे जातो. त्यानुसार कोनासीमा जिल्हय़ाचे नामांतर डॉ. आंबेडकरांच्या नावे झाले. मग विरोध का? औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी जुनीच आहे. त्यावर केंद्र सरकार का निर्णय घेत नाही? की संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात व त्या आगीवर राजकीय भाकऱया शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“जम्मू-कश्मीर प्रांतात सातत्याने अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत. श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची सात वर्षांची मुलगी जखमी झाली. हवालदार कश्मिरी पंडित नव्हता. हवालदाराचे नाव सैफुल्लाह कादरी. त्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. याआधी पुलवामातील पोलीस उपअधीक्षकास अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. राहुल भट्ट या कश्मिरी पंडितास तहसील कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या, पण गेल्या दोन महिन्यांत कश्मीर खोऱयात 12 मुसलमान पोलीस अधिकारी मारले गेले ही वस्तुस्थिती आहे. हिंदू आणि मुसलमान यांची पर्वा न करता कश्मीर खोऱयात अतिरेक्यांचा खुनी खेळ सुरू आहे. जे देशाच्या बाजूने आहेत त्यांचा खात्मा करायचा असे अतिरेक्यांचे धोरण आहे. भाजपला फक्त एकाच समाजाची, धर्माची बलिदाने दिसतात. हे ‘राष्ट्रीय’ एकात्मतेचे लक्षण नाही. देशासाठी बलिदान देणारा हिंदू जितका प्रिय, तितकाच त्याच देशासाठी बलिदान देणाऱया मुसलमानाचाही सन्मान व्हायला हवा,” असं मत संजय राऊतांनी मांडलं आहे.

“जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात आहे असे जागतिक अर्थतज्ञ कौशिक बसू यांनी स्पष्ट केले आहे. धार्मिक-जातीय धुवीकरणामुळे देशाचा पायाच डळमळीत झाला आहे. भारतात सध्या सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीचे आहे. बेरोजगारी दर 24 टक्क्यांवर पोहोचला असून तो जगात सर्वाधिक आहे, असे कौशिक यांचे म्हणणे आहे. गेल्या सात वर्षांत देशातले उद्योग बंद पडले, नवे उद्योग आले नाहीत. देशातले वातावरण उद्योगांसाठी बरे नाही. सरकार त्याच्या एखाददुसऱया लाडक्या उद्योगपतीसाठी पायघडय़ा घालत आहे. विमानतळांपासून सार्वजनिक कंपन्यांपर्यंतचे सार्वजनिक उपक्रम त्याच त्याच उद्योगपतींच्या खिशात कोंबत आहे. याला विकास कसे म्हणावे? यातून बेरोजगारी कशी कमी होणार? जगात सर्वाधिक बेरोजगार असलेल्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतात व त्या नात्याने ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वावरतात तेव्हा आश्चर्य वाटते,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

“जपानमधील ‘क्वॉड’ देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेते एकत्र आले. हे सर्व नेते चालत आहेत व त्यांच्या सगळय़ात पुढे आपले पंतप्रधान मोदी असल्याचे छायाचित्र हिंदुस्थानात प्रसिद्ध झाले, ते सुखावणारे आहे, पण त्याच जागतिक व्यासपीठावर आपली बेरोजगारी सगळय़ात जास्त आहे त्याचे काय?,” असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊतांनी यावेळी काही मुद्दे उपस्थित केले आहेत –

1) पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले. प्रत्येक कामात टेंडरमध्ये ते एक टक्का कमिशन मागत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. एक टक्का कमिशन मागणारे मंत्री फक्त एका महिन्यात निपजले.

2) औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उकरून काढला आहे. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा ठरत असेल तर भाजपने कुदळ-फावडी घेऊन त्या कबरीची बाबरी करण्याचे धाडस दाखवावे, पण सत्य असे की, औरंगजेबाची कबर भारत सरकारच्याच पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येते व आता ही कबर पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे. यावर भाजप मंडळाचे काय म्हणणे आहे?

3) ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि कुतुबमिनारच्या मालकीवरून भाजपच्या उठवळ हिंदुत्ववाद्यांनी नवे वाद सुरू केले आहेत. मोगलांचे राज्य दिल्ली व आसपासच्या परिसरात 800 वर्षे होते. मोगलांकडून ते राज्य ब्रिटिशांनी घेतले. ताजमहाल, कुतुबमिनार मोगलांनीच बांधले. त्याखाली मंदिरे होती असे आता संशोधन सुरू आहे. यावर ‘‘मोगलांचा इतका राग करता, मग मोगलांच्या बायका कोण होत्या?’’ असा पांचट प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला. जोधाबाई अकबराची पत्नी होती, तर मस्तानी पराक्रमी बाजीरावाची होती. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवले, पण देशाच्या राजकारणातून आज मानवी नाते व सन्मान नष्ट झाला आहे. आपल्याच देशातील राजकारणाला आपण वळण देऊ शकलो नाही, जगाला काय दिशा देणार?

“देशात एकपक्षी व एकछत्री अंमल आहे, पण प्रत्येक राज्य स्वतःचे वेगळे राजकारण खेळत आहे. पंजाब, कश्मीर पुन्हा अशांत होत आहेत, पण इतर राज्यांनीही स्थिर राहू नये यासाठी केंद्रच प्रयत्न करीत असेल तर हा देश टिकणार कसा? जागतिक नेत्यांच्या फोटोत मोदी सर्वात पुढे याचे कौतुक करायचे की जगाच्या बेरोजगारीत आपण पुढे याची खंत बाळगायची?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.