पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

“कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला,” तुफान गर्दीत संजय राठोड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी

“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार”; पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं

दरम्यान उद्धव ठाकरे यांनीयाप्रकरणी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना मुख्य सचिव संजय कुमार यांना दिल्या आहेत.

भाजपाकडून अटकेची मागणी
संजय राठोड यांनी अटक करुन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. “राठोड यांच्याविरोधात एवढे पुरावे उपलब्ध असताना अद्याप कारवाई का झाली नाही,” असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली असताना मंत्र्यांनीच ही गर्दी कशी जमवली,” असाही प्रश्न विचारला आहे.

पूजा चव्हाण तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट
“पूजावर खूप ताण होता”; वडिलांनी प्रथमच केला खुलासा

“माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार”
संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले असता पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

“पुण्यात तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं असून आम्ही सर्व त्यात सहभागी होतं. पण ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते दुर्दैवी आहे. मी मागासवर्गीय कुटुंबातून असून ओबीसीचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सर्वांनी पाहिला आहे,” असं ते म्हणाले.

“प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं यामधून जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यात कोणतंही तथ्य नाही. याची चौकशी मुख्यमंत्र्य्यांनी लावली आहे. त्या माध्यमातून पोलीस तपास करत असून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण गेल्या १० दिवसांपासून समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमांमधून बदनामी आणि घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करत असून माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका,” अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

“मी चार वेळा निवडून आलो आहे. माझ्या समाजाचं प्रेम माझ्यावर आहे. अनेक लोक फोटो काढत असतात. मी ३० वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असून सर्वांना सोबत घेऊन काम केलं आहे. एका घटनेमुळे आपण सर्वजण मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका एवढीच विनंती आहे,” असं संजय राठोड यांनी सांगितलं.