राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या नाट्यमय घडामोडींमध्ये गुरुवारी एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या या खेळीचे अनेक अर्थ काढले जात असले, तरी महाविकास आघाडीकडून आणि शिवसेनेकडून यावरून भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आधी शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता, असं विधान करून चर्चेची राळ उडवून दिली असताना आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आणि भाजपाचा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा वायदा यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्यांच्यासारख्या आम्ही अडचणी निर्माण करणार नाही”

“नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रीमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून अडचणी निर्माण करण्यात आल्या. पण अशी कोणतीही अडचण आम्ही निर्माण करणार नाही. जनतेच्या कामांना प्राधान्य असेल. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला पुढे न्यावं या शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्र आमच्यासाठी सर्वोच्च आहे” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस शिंदेंचं राईट हँड”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस शिंदेंचे राईट हँड झाल्याचा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. “एकनाथ शिंदेंना अनुभव आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस आता त्यांचे राईट हँड मॅन आहेत. दोघांनी मिळून महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न त्यांनी मार्गी लावावेत. हे करत असताना प्रशासन, पोलीस दल नि:पक्षपातीपणे काम करतील याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले. “फडणवीसांना राज्य चालवण्याचा जास्त अनुभव आहे. त्यांनी पक्षाचा आदेश पाळून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आहे. त्यामुळे दोघे एकमेकांचे राईट हँड आहेत”, असं देखील राऊत पुढे म्हणाले.

“…मग तेव्हा युती का तोडली?”; शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा थेट सवाल

“भाजपानं शिवसैनिक म्हणून त्यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सगळ्यांवरच उपकार आहेत. भाजपासोबत शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलं आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वत:ला शिवसेनेचे म्हणत राहतील, तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल”, असं भाकित संजय राऊतांनी वर्तवलं आहे.

“मग राणेंना मुख्यमंत्री का नाही केलं?”

दरम्यान, शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं, तर मग नारायण राणेंना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल राऊतांनी भाजपाला केला आहे. “शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायंच होतं, तर नारायण राणेंना का मुख्यमंत्री केलं नाही? तेही शिवसैनिकच होते. त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं, तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. राजकारण सोयीनुसार आणि संधी पाहून केलं जातं. त्यांच्या पक्षात अनेक शिवसैनिक गेलेत. पण त्या कुणालाही त्यांनी मुख्यमंत्री केलं नाही. शिवसेना फोडण्यासाठीचा प्लॅन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. जिथे ठाकरे, तिथे शिवसेना. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं आता म्हणणार नाही. उद्धव ठाकरेंशी झालेल्या मतभेदांमुळे तुम्ही बाहेर गेलात. आता तुम्ही नव्या घरात, नव्या संसारात सुखाने नांदा.. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो”, असं राऊत म्हणाले.

“कालच्या निर्णयानंतर भाजपाच्या हाती काय लागलं?”

“अडीच वर्षाचा करार होता, त्याचं पालन आत्ता भाजपानं केलं आहे. तेव्हा शब्द पाळला असता, तर अडीच वर्षांचा काळ आत्ता कुणाचातरी एकाचा संपला असता. शिवसेना भाजपा युती कायम राहिली असती. पण कालच्या निर्णयानंतर भाजपाच्या हाती काय लागलं? या किंवा त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्याच माणसाकडे पाच वर्ष गेलं. शिवसैनिक म्हणूनच त्यांना तिथे घेतलंय. दुसऱ्या कुठल्या पक्षाचे म्हणून त्यांना तिथे घेतलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम त्यांनी केलंय”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut slams eknath shinde devendra fadnavis bjp pmw
First published on: 01-07-2022 at 10:14 IST