scorecardresearch

“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे कुणालातरी पकडून…”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “त्या’ फॉर्म्युल्याची भीती ज्यांना वाटतेय, त्यांनी फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण सुरू केलं आहे. पण महाराष्ट्राची जनता त्याला भीक घालणार नाही”

Sanjay Raut 14
(संग्रहीत छायाचित्र)

राजधानी दिल्लीमध्ये नुकत्यात घडलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वातावरण ढवळून निघालं असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून थेट केंद्रातील सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. या सगळ्याला भाजपाच जबाबदार असून या दंगली भाजपानेच प्रायोजित केल्या असल्याचा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी कला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपानं यासाठीच दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलल्याचा देखील दावा केला आहे.

“आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता…”

दिल्लीतील निवडणुका पुढे ढकलणं हा भाजपाच्याच नियोजनाचा भाग असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “देशाच्या दोन प्रमुख शहरांमध्ये ज्या प्रकारे दंग्यांचं वातावरण तयार केलं आहे, विशेषत: सत्ताधारी भाजपाकडून, हे फार दुर्दैवी आहे. देशाच्या राजधानीत दंगली होत आहेत. हे पहिल्यांदा होत नाहीये. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या आहेत. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी कोणता मुद्दा नाही म्हणून सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मुंबईत कुणालातरी पकडून…”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आहे. आणि तुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाची अर्थव्यवस्था आत्ता कुठे मूळ पदावर येत आहे. पण पुन्हा एकदा राजकीय फायद्यासाठी दंगलींचं राजकारण केलं, तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल, संपून जाईल”, असं राऊत म्हणाले. “देशातले दंगे सत्ताधारी पक्षानं प्रायोजित केले आहेत”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

भाजपाची ‘फोडा आणि झोडा’ ही ब्रिटिशनीती!

दरम्यान, भाजपाकडून ब्रिटिशनीती राबवली जात असल्याचं राऊत म्हणाले. “आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू. हा यशस्वी फॉर्म्युला महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्याच फॉर्म्युल्याची भिती ज्यांना वाटतेय, त्यांनी फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण सुरू केलं आहे. पण महाराष्ट्राची जनता त्याला भीक घालणार नाही”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut targets bjp raj thackeray on jahangir puri voilance pmw

ताज्या बातम्या