shivsena sanjay raut thackeray group slams cm eknath shinde maharashtra karnataka border issue | Loksatta

“आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या…”, संजय राऊतांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

संजय राऊत म्हणतात, “बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचं ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत?”

“आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या…”, संजय राऊतांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!
संजय राऊत ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या दोन्ही राज्यांमध्ये रान उठलं आहे. राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते यामध्ये मध्यस्थी करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावरही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हा वाद चिघळला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“असे एकमेव मुख्यमंत्री आहेत की…”

या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, की त्यांनी आत्तापर्यंत यावर तोंड उघडलेलं नाही. त्यांच्या गटाची निशाणी ढाल-तलवार नसून कुलूप असायला हवी. त्याची चावी दिल्लीकडे आहे. दिल्लीवाले जेव्हा कुलूप उघडतील, तेव्हा हे बोलतील. पण त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. काल सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. तेव्हा हे सगळे कुठे होते?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“महाराष्ट्राचा अपमान करावा यासाठीच हे षडयंत्र आहे. अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उठून उभं राहायचं असतं, पण तेच बसले आहेत”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

Maharashtra Karnataka Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं थेट अमित शाह यांना आव्हान? महाराष्ट्राला डिवचत म्हणाले “त्यांची भेट घेऊन…”

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत?”

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशीच दिसतेय की आमचं ते आमचंच आणि तुमचं तेही आमच्या बापाचं. पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमच्यापुढचा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत याच्याशी महाराष्ट्राला काही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईंना कशाप्रकारे उत्तर देतायत किंवा ते या लढाईत उतरले आहेत की नाहीत? ते कुठे आहेत? गेल्या अनेक दिवसांत या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेलं नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली.

“…मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार?”

“काल महाविकास आघाडीचे खासदार अमित शाह यांना भेटले. लोकसभेतही आमचे खासदार बोलत होते. पण या (शिंदे गट) पळपुट्या खासदारांनी सीमाप्रश्नावर तोंड उघडलं नाही याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहील. बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचं ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत?” असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 10:36 IST
Next Story
“तडजोड करणार नाही,” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचल्यानंतर ठाकरे गट संतापला, म्हणाले “केंद्राला आणि वरिष्ठांनाही जुमानत…”