scorecardresearch

बाबरी कोणी पाडली? आडवाणींचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर; म्हणाले “ऐका…”

बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणी नव्हतं म्हणणाऱ्या फडणवीसांसाठी राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणी नव्हतं म्हणणाऱ्या फडणवीसांसाठी राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

एकीकडे भोंग्यांवरुन मनसे आणि सत्ताधारी आमने असताना भाजपाने बाबरीच्या मुद्यावरुन शिवसेनेला घेरलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपाचे नेते होते असं यावेळी फडणवीस म्हणाले. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते –

“मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो,” अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली.

बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणी नव्हतं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर; म्हणाले, “अज्ञानांना…”

“बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत काय?

संजय राऊत यांनी लालकृष्ण आडवाणींच्या एका मुलाखतीमधील ४३ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. २९ डिसेंबर २००० रोजी एनडीटीव्हीने ही मुलाखत घेतली होती.

बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता : देवेंद्र फडणवीस

यामध्ये लालकृष्ण आडवाणी सांगत आहेत की, “६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मी सर्वात प्रथम उमा भारती यांना पाठवलं होतं. परत आल्यानंतर त्यांनी घुमटावर चढलेले लोक मराठीत बोलत असून ऐकायला तयार नसल्याचं सांगितलं. म्हणून मी प्रमोद महाजन यांना पाठवलं. पण तेदेखील हतबल होऊन परत आले. मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना मला जाऊ द्या असं सांगितलं. पण त्यांनी जाऊ दिलं नाही”.

यासोबत संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील काही बातम्यांचे फोटोही शेअर केले आहेत.

दरम्यान सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं होतं. “बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलं.

“इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला झालं काय? संपलेला विषय का काढत आहेत?वातावरण बदललं आहे, प्रश्न बदलले आहेत. अशावेळी मूळ प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपा आणि त्यांचे छुपे साथीदार याकडे लोकांना आकर्षित करत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान फडणवीसांनी तुम्ही रामाच्या बाजूने आहात की रावणाच्या अशी विचारणा केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut tweets bjp leader lk advani video over babari demolition sgy

ताज्या बातम्या