शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या दिल्लीमधील भेटीगाठीमुळे चर्चेत आहेत. नुकतीच संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. दरम्यान राहुल गांधी भेटीत संजय राऊत यांनी युपीएला पुनर्जिवित केलं पाहिजे असं मत मांडलं आहे. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीए आहे कुठे? अशी विचारणा करत नवे संकेत दिले असताना शिवसेनेने मात्र काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची आघाडी उभी राहू शकत नाही असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना युपीएत सहभागी होऊ शकते असे संकेत दिले आहेत. “आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मिनी-युपीए चालवत आहोत. यामुळे केंद्रीय स्तरावरही अशा प्रकारची व्यवस्था हवी,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“राहुल गांधींनी पुढाकार घेतला याचा अर्थ शरद पवारांनी…,” संजय राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका

शिवसेना युपीएत सहभागी होणार का? असं विचारण्यात आलं असता संजय राऊतांनी सांगितलं की, “मी राहुल गांधींना प्रत्येकाला निमंत्रण देण्यास सांगितलं आहे. लोक फक्त येणार आणि सहभागी होणार असं होत नाही. जर एखादं लग्न असेल तर निमंत्रण द्यावं लागतं. आधी निमंत्रण येऊ दे…त्यानंतर आम्ही याबद्दल विचार करु. मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोललो आहे”.

महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला प्रयोग मिनी यूपीएचाच- संजय राऊत

संजय राऊत यांनी यावेळी राहुल गांधींचं तोंडभरुन कौतुक केलं. “लोक त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने विचार करतात ते योग्य नाही. तेदेखील योग्य विचार करतात. त्यांच्या पक्षात काही कमतरता आहेत. त्यांना या सर्व समस्या दूर करायच्या आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.