शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीला भाजपाने आता दीनदयाळ थाळीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे.

शिवभोजन थाळीच्या तुलनेत दीनदयाळ थाळीची किंमत थोडी जास्त आहे. पण या थाळीमध्ये १० पदार्थ आहेत. शिवभोजन थाळी १० रुपयांना तर, दीनदयाळ थाळी ३० रुपयांना आहे. विठ्ठल मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ ही थाळी आजपासून सुरु झाली आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीचा शुभारंभ झाला. पंढरपूरातील एका महिला बचत गटाला सोबत घेऊन भाजपाने ही योजना सुरु केली आहे. दुपारी १२ ते एक या वेळेत ही थाळी सर्वांना दिली जाईल.

शिवभोजन थाळीत काय मिळते?
भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात.

दीन दयाळ थाळीत काय मिळते ?
दीन दयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लींबू याचा आस्वाद घेता येईल.