'‘खोके’वाल्यांचा अधर्म...', 'पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा...'; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल | Shivsena Slams BJP and Eknath Shinde group ahead of Dasara melava scsg 91 | Loksatta

‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

‘पीएफआय’पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी चालवला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल
शिवसेनेतील फुटीनंतरचा आज पहिलाच दसरा मेळावा

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आज होत असलेल्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत आज ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन मेळावे होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी गर्दी जमविण्यावर भर देण्यात आला असून, या मेळाव्यांत उभय बाजूने आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. असं असतानाच उद्धव ठाकरेंच्या भाषणाची झळक उद्धव ठाकरे संपादक असणाऱ्या ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून पहायला मिळत आहे. मुंबईला वेगळं करण्याचा डाव, पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये केलेली विधानं, चीन, विदर्भाचा मुद्दा यासारख्या मुद्यांबरोबरच भाजपाला महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट करणार यासारख्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”

यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार
“आजचा विजयादशमीचा अतिशय मोठा आनंदाचा आणि मांगल्याचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. मात्र या पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी केली आहे ती महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी. हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते. अनेक लाटा आणि कपट-कारस्थानांशी टक्कर देत शिवतीर्थावरील हे सीमोल्लंघन सुरूच राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याचाच दिवस का निवडला? त्याला विशेष महत्त्व आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाने याच दिवशी दहा तोंडी रावणाचा वध केला होता. देवी दुर्गेने दहा दिवसांच्या घनघोर युद्धानंतर याच दिवशी महिषासुर नामक राक्षसाचा वध केला होता. या दिवशी सर्व अमंगल गोष्टींचा, कपट-कारस्थानांचा नाश होतो म्हणून विजयादशमीला आपल्या हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे…
“रावण मारला गेला तो आजच्याच दिवशी. रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली होती. त्या अहंकाराने त्याचा बळी घेतला. महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात आज सगळे काही विस्कटलेले आहे. एक राज्य गेले व दुसरे आले म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले असे म्हणता येत नाही. बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना
“भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदावर येताच काय जाहीर केले, ‘‘योग्य वेळ येताच विदर्भ हे स्वतंत्र राज्य करू.’’ म्हणजे देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत आहेत,” असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते गुजरातइतकेच…
“महाराष्ट्रातील उद्योग खेचून-पळवून गुजरातेत नेले जात आहेत. एक ‘वेदांता’च नाही, तर ‘ड्रग्ज पार्क’पासून अनेक प्रकल्प उद्योगपतींना फूस लावून, आमिषे दाखवून न्यायचे हे कसले लक्षण मानावे? महाराष्ट्रातील तरुणांचा पाचेक लाख रोजगार त्यामुळे बुडाला. पंतप्रधान मोदी हे सध्या गुजरातच्या निवडणुकीत अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना गुजरातशिवाय काहीच दिसत नाही. गुजरातला बदनाम करण्याचे व या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे कारस्थान काही जणांनी रचल्याचे विधान आमच्या पंतप्रधानांनी करावे हे दुर्दैवच म्हणायला हवे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते गुजरातइतकेच महाराष्ट्राचे आहेत हे तत्त्व आम्ही तरी पाळतो,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘गर्वी गुजरात’चे संरक्षण ‘बाबरी’ दंगलीनंतर शिवसेनेने केले
“गुजरातचे ‘शहा’ हे मुंबई ताब्यात घेण्याची भाषा करतात. त्याआधी शिवसेनेला ‘पटक देंगे’ वगैरे झुंडशाहीची भाषा ते करीत होते. या ‘पटक’बाजीला ‘पुरून’ शिवसेना आज उभी आहे. गुजरातशी आमचा झगडा नाही. गुजरात महाराष्ट्राचे जुळे भावंडच आहे. नर्मदा शंकर नावाचे कवी सवाशे वर्षांपूर्वी होऊन गेले. ‘जय जय गर्वी गुजराथ’ असे काव्य त्याने लिहिले ते योग्यच आहे. त्या ‘गर्वी गुजरात’चे संरक्षण ‘बाबरी’ दंगलीनंतर शिवसेनेने केले. एक हिंदुत्व म्हणून शिवसेनेने ते कर्तव्य पार पाडले, पण त्या बांधवांच्या डोक्यात विष भिनविण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. ते महाराष्ट्र आणि गुजरातलाच नाही, तर देशालाच धोकादायक आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घेतले पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

…हे लोकशाहीचे लक्षण नाही
“संपूर्ण देशाचे वातावरण एका दबावाखाली, तणावाखाली आहे. ‘पीएफआय’सारख्या दहशतवादी विचारांच्या संघटनांचा बीमोड केला जात आहे, हे चांगलेच आहे. अशा प्रकारची विषवल्ली उपटून नष्टच केली पाहिजे. अशा कारवाया राष्ट्रहितासाठी आवश्यक ठरतात, पण कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ‘जैसे थे’ आहे. तेथील कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिल्लीला अस्वस्थ करू शकलेला नाही याचे दुःख आहे. ‘पीएफआय’पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी चालवला आहे. राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या संस्था बेकायदेशीरपणे वापरल्या जातात तेव्हा देशात कायद्याचे राज्य आहे असे अजिबात म्हणता येत नाही. राजकीय विरोधक भयग्रस्त असणे हे लोकशाहीचे लक्षण नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “संध्याकाळपर्यंत…”

त्यांना धडा कधी शिकविणार?
“तिकडे रशियाच्या पुतीनने युद्ध करून युक्रेनचे तीन प्रांत रशियास जोडून घेतले आणि आपल्याकडे पाकव्याप्त कश्मीर मिळवून अखंड भारताच्या निर्मितीच्या फक्त वल्गनाच सुरू आहेत. वल्गना आणि आश्वासनांशिवाय लोकांच्या नशिबी दुसरे काहीच दिसत नाही. रुपयाची किंमत मातीस मिळाली, महागाई वाढली, बेरोजगारी वाढतच आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे व त्यावर उपाय काय, तर यापुढे ‘हॅलो’ म्हणायचे नाही, तर ‘वंदे मातरम्’ म्हणा! ही मातृभूमी आमचीच आहे. त्या मातृभूमीपुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत, पण ही भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् कधी होणार? चीन फक्त लडाखच्या सीमेवर नाही, तर अरुणाचलातही घुसला आहे. त्यांना धडा कधी शिकविणार?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

मुंबई गेली तरी महाराष्ट्र मेला…
“‘वंदे मातरम्’चा हाच खरा अर्थ आहे. महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? आज महाराष्ट्रात पूर्णपणे बेकायदेशीर सरकार सत्तेवर लादले गेले आहे. शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्र स्वाभिमानी संघटना मोडून टाकायच्या व त्यासाठी गद्दारांना बळ द्यायचे, याच हेतूने सर्व राजकारण चालले आहे. मुंबई त्यांना जिंकायचीच नाही, तर गिळायची आहे. त्यांची भाषा तशीच आहे. सेनापती बापट यांनी एक मंत्र दिला होता- महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले. या काव्यात थोडा बदल करून प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटले होते- महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मुंबई गेली तरी महाराष्ट्र मेला, आज भाजपाची पावले त्याच दिशेने पडत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आता शिवसेनेच्या नव्या लढ्याची नांदी
“दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढ्य संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपाच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राचे भवितव्य जर कुठे निर्माण झाले असेल तर याच रणमैदानावर, याच रणक्षेत्रावर. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मैदानावर सुरू झाला आणि याच मैदानावर पूर्ण झाला. शिवसेनेचे प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकले. आता शिवसेनेच्या नव्या लढ्याची नांदी याच ठिकाणी होत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

भाजपा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल
“आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजपा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठsपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे!,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-10-2022 at 08:21 IST
Next Story
मराठवाडय़ातील सिंचनासाठी ११ हजार कोटी ; भाजपची खेळी