scorecardresearch

“…तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील पण फडणवीस…”; शिवसेनेचा राणेंच्या दिशेने इशारा

तुला सोडणार नाही, असा इशारा नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला

“…तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील पण फडणवीस…”; शिवसेनेचा राणेंच्या दिशेने इशारा
सामनामधून शिवसेनेचा हल्लाबोल (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमधून क्लिन चीट दिल्याचा आरोप करत शिवसेनेनं आजच्या ‘सामना’मधून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या स्थापना करण्याची घोषणा केल्याच्या मुद्द्यावरुन आक्षेपही शिवसेनेनं घेतला आहे. या प्रकरणामध्य सत्ताधाऱ्यांकडून मागील आठवडाभरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या कामाकाजदरम्यान आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसून आलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनीही या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. यावरुनच आता शिवसेनेनं कोकणातील काही गाजलेल्या प्रकरणांबद्दल एसआयटी स्थापन करण्याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

“नागपूर ‘एनआयटी’च्या १६ भूखंड व्यवहारात ११० कोटींचे भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे यातील भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे व भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय! नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत. आमदार महेश शिंदे म्हणताहेत, ‘‘आम्ही खोके घेतले.’’ मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नारायण राणेंनी या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत काही गंभीर आरोप केले. “सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणार. दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला आहे, तू हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा” असा गंभीर इशारा नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील जाहीर कार्यक्रमात बोलताना दिला. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं थेट राणेंचं नाव न घेता टीका केली आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस, हेच का संघाचे संस्कार?” शिवसेनेचा सवाल; शिंदे गटालाही टोला लगावताना म्हणाले, “४० बोक्यांचा आनंद…”

“सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ‘ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी त्यांची गत झालेली दिसते. नागपूरच्या अधिवेशनात सरकारची लक्तरेच निघाली आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 09:37 IST

संबंधित बातम्या