चीनमध्ये झालेला करोनाचा उद्गेक आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच गोवरच्या साथीचा संदर्भ देत चीनप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रात गोवरविरोधात जनक्षोभ उसळून लोक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पहायला मिळू नये असं म्हणत ठाकरे गटाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने तर महाराष्ट्रात गोवरच्या साथीने हाहाकार माजवला आहे. गोवरचे संकट आहेच, पण ज्या पद्धतीने चीनमध्ये करोना पसरला आहे ते पाहता महाराष्ट्राला सावधान राहायला हवे. गोवर आणि करोनाच्या बातम्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. मुंबईसह राज्यभरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली. त्यातले सर्वाधिक ‘गोवर’ रुग्ण मुंबई शहरात आहेत. त्याच वेळी चीनमध्ये रविवारी एकाच दिवशी करोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचली व आकडा वाढतोच आहे. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा ‘लॉकडाऊन’सारखे कडक निर्बंध लागू केले. या लॉकडाऊनच्या विरोधात चीनमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने सुरू झाली आहेत. त्याठिकाणी गेल्या काही दिवसांत २०० ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र ‘लॉकडाऊन नको. आता आम्ही जगायचे कसे,’ या उद्रेकाच्या भावनेने लोक चीन सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. ‘‘आम्हाला या सगळ्याचा वीट आला आहे. लॉकडाऊनची भीती वाटतेय. खूप एकटेपणा वाटतोय,’’ अशा भावना तेथील लोकांनी व्यक्त केल्या व लॉकडाऊनच्या निषेधार्थ सरकारविरोधात बंडच केले. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वप्रथम झाला त्या वुहान शहरासह १२ प्रमुख शहरे बंद करण्यात आली आहेत. चीनच्या रस्त्यांवर पोलीस विरुद्ध विद्यार्थी, जनता असा संघर्ष सुरू आहे व त्याची दखल भारताने घ्यायला हवी,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

“करोनाचे संकट चीनमध्ये असले तरी घोर जगाला लागला आहे. भारताने करोनाच्या दोन लाटांशी मुकाबला केला. त्या काळात करोना मृतांची हजारो प्रेते गंगेत सोडून देण्यात आल्याचे चित्र जगाने पाहिले. आता ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून भारत तयार आहे काय?” असा प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये विचारण्यात आला आहे. “आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील ‘संकट’ वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर करोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते. ते संकट चीनबरोबरच्या चर्चेने सुटणार नसून त्या संकटाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्यविषयक ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची उभारणी करावी लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“राज्याराज्यांतील सरकारे पाडून वगैरे ही लढाई पुढे जाणार नाही किंवा ‘ईडी’वाल्यांच्या हातात शस्त्र देऊनही करोना घाबरून पळ काढणार नाही,” असा खोचक टोलाही या लेखात लगावला आहे. “पुन्हा जे करोनाचे तेच मुंबईसह महाराष्ट्रात पसरलेल्या गोवरच्या साथीचे म्हणावे लागेल. गोवरची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते. म्हणजे करोनाप्रमाणेच हा आजार संपर्क व स्पर्शातून पुढे जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालयाने कोणती पाऊले उचलली आहेत? लसीकरण वगैरे वाढविण्याचे बोलले जात आहे, पण ते सर्व कागदावरच दिसतेय. गोवरसंदर्भात दिल्लीत एक उच्च स्तरीय बैठक होऊन गोवरच्या साथीचा आढावा घेण्यात आला. गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात एक बेजबाबदार व उठवळ आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“करोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. करोनाप्रमाणे गोवरसाठीही विलगीकरणाची गरज असून हे निर्बंध कठोरपणे अंमलात आणायला हवेत. गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व महापालिकांना देण्यात आले हे ठीक; पण ही विलगीकरण पेंद्रे नक्की कोठे असणार, त्याची काय तयारी सुरू आहे त्याबाबतच्या सूचना कोण देणार? करोना काळात राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे लोकांशी संवाद साधून माहिती देत होते. इस्पितळात व कोविड पेंद्रांना भेटी देत होते, पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत. कधी आसामचे पर्यटन तर कधी दुसरे काही, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये करोना लॉकडाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?” असा टोला सेनेनं लेखाच्या शेवटी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams shinde and bjp over measles outbreak in mumbai scsg
First published on: 29-11-2022 at 07:52 IST