Premium

“काँग्रेस हे गंजलेलं लोखंड, तर भाजपा…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

भोपाळमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता महाकूंभ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेस पक्ष हा गंजलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता शहरी नक्षलवाद्यांकडे आहे.

Uddhav Thackeray Narendra Modi (2)
पंतप्रधान मोदी यांच्या काँग्रेसवरील टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी करत आहेत. भारतीय जनता पार्टीने सोमवारी (२५ सप्टेंबर) मध्य प्रदेशमधल्या भोपाळ शहरातील जांबोरी मैदानात कार्यकर्ता महाकूंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गंजलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे. काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे. काँग्रेस हा पक्ष आता काँग्रेसचे नेते चालवत नाहीत. काँग्रेस ही एक अशी कंपनी झाली आहे, ज्यांच्या घोषणांपासून धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी आयात केल्या जात आहेत. काँग्रेसचा ठेका आता काही शहरी नक्षलवाद्यांकडे आहे. काँग्रेसमध्ये आता शहरी नक्षलवाद्यांचंच चालतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करत आहेत. आपण देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान न ठेवता ते भाजपाच्या मेळाव्यांतून भाषणे करत आहेत.

ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, मोदींचे म्हणणे आहे की, ‘‘सर्वात आधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला गेला असून त्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे.’’ मोदी यांचे हे वक्तव्य राजकीय संस्कृती आणि सभ्यतेस धरून नाही. काँग्रेस पक्ष संपला असे मोदी म्हणतात, पण गेल्या नऊ वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मोदींनी काँग्रेसचा जप केला नाही.

ठाकरे गटाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही अलोकशाहीवादी गर्जना त्यांनी केली, पण त्यांना काँग्रेसला संपवता आले नाही. मोदी यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांना संपवायचे आहे, परंतु, त्यांना लडाखमध्ये घुसलेल्या चीनला संपवायचे नाही. त्यांना महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार संपवायचे नाहीत. त्यांना काँग्रेसला संपवायचे आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना काँग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला संपवता आलं नाही.

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला आमचा विरोध”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटलं आहे की, काँग्रेस हा पक्ष गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया कंपनी जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे आणि गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजपा हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य आणि नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे आणि लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena thackeray answer to pm modi criticism of congress as rusty iron asc

First published on: 27-09-2023 at 09:02 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा