Ex MLA Rajan Salvi : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण सामंत यांनी पराभव केला. या पराभवानंतर राजन साळवी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर राजन साळवी यांनी गुरुवारी (२ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, मात्र, पण तसं काही नाही’, असं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिलं होतं. मात्र, आज राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. “मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन”, असं स्वत: राजन साळवी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

राजन साळवी काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितलं की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. तसेच आज लांजा येथील पदाधिकाऱ्यांनी मला बोलावलं होतं. मी या ठिकाणीही आलो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्या भावना मी त्यांच्याबरोबर व्यक्त केल्या. यावेळी निश्चितच भविष्यात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईन असं मी त्यांना सांगितलं आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Jitendra Awhad : Video : घरावर पोलिसांची पाळत? पत्रकार परिषदेत घुसून चित्रीकरण केल्याचा आरोप; जितेंद्र आव्हाड संतापले; नेमकं काय घडलं?

‘पराभवाला वरिष्ठ कारणीभूत’

“माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणं गरजेचं आहे. जर शोधलं नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही योग्य निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत”, असं राजन साळवी यांनी म्हटलं.

राजन साळवींनी काल काय स्पष्टीकरण दिलं होतं?

“ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचं दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करतेय. तुमच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, यात कोणतीही शंका नाही”, असं राजन साळवी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray group leader rajan salvis big statement will take the right decision at the right time gkt