“सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल, असं वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने भांडणे होऊन खेळखंडोबा होईल. यातून जमले नाही म्हणून वेगळे गेलो सांगायचं,” असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. “महाविकास आघाडीत बापात बाप नाही, लेकात लेक नाही, अशी परिस्थिती आहे,” असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाविकास आघाडीस आम्हाला बाहेर ठेवायचं आहे. ठिकाय बाहेर ठेवा, फरक पडत नाही. पण, तुमच्यात तरी जागावाटप करा. लोकसभेच्या ४८ जागांचं वाटप करण्यासाठी आधी चर्चा तर करा… मात्र, महाविकास आघाडीत बापात बाप नाही, लेकात लेक नाही, अशी परिस्थिती आहे. १६ आमदार अपात्र झाले, तर ४० जण आणखी प्रवेश करण्यास तयार आहेत,” असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.




हेही वाचा : संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण…”
“…म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले”
यावर सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “विघ्नसंतोषी लोकांची काही मते असतील, ते असुद्या. आम्हाला त्यावर फार भाष्य करायचं नाही आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहणार आहे. परंतु, महाविकास आघाडी होऊ नये, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. त्यांना वाटतं काहीही करून भाजपाची सरशी झाली पाहिजे, तर तसं होणार नाही.”
“…तेव्हा आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही”
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर नागपुरात प्रश्न विचारल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांची आमच्याबद्दल असणारी मते, आजची नाहीत. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित अशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही. त्यांचं आमच्या पक्षाबद्दल वेगळं मत आहे, हे प्रकार्षाने जाणवलं आहे.”
हेही वाचा : संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीचा शिंदे गटातील आमदाराने घेतला समाचार; आव्हान देत म्हणाले…
“…तसा कोणातीही प्रस्ताव आमच्याकडं नाही”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर भाष्य केलं आहे. “प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचा आता काही संबंध नाही. तसा कोणातीही प्रस्ताव आमच्याकडं नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर काहीही बोलणार नाही. त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा प्रश्न आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.