Sanjay Raut On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी मागितलेली माफी ही राजकीय असल्याची टीका आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात आले होते. वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिकडच्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. ‘मोदी परत जा’, अशा घोषणाही आदिवासी बांधवांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संताप उसळला हे पाहून आपण जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात भविष्यात मोठ्या संतापाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय माफी मागितली”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी ही राजकीय माफी आहे. आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी म्हणून त्यांनी माफी मागितली. पण माफी मागून प्रश्न सुटत असतील तर माफी मागून टाका, असा सल्ला त्यांना राज्यातील काही नेत्यांनी दिला असेल. या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी माफी मागितली. मात्र, त्यांच्या माफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं काम केलं असलं तरी महाराष्ट्र देखील महाराष्ट्राचं काम करेल”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
“पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असली तर उद्यापासून राज्यभरात जोडे मारो आंदोलनात कोणताही बदल होणार नाही. उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक एकत्र येत जोडे मारो आंदोलन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरंच जर गांभीर्य असतं तर पुलवामामध्ये ज्यावेळी हल्ला झाला होता, तेव्हाही त्यांनी माफी मागितली असती. मात्र, प्रत्येकवेळी पंतप्रधान मोदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करतात”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय होते?
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी जे काही घडलं ते दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली.