scorecardresearch

“संतोष बांगरांच्यात हिंमत असेल, तर राऊतांच्या…”, हिंगोलीतील ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान

विनायक भिसे म्हणतात, “संतोष बांगरांना सांगू इच्छितो, संजय राऊतांना…”

“संतोष बांगरांच्यात हिंमत असेल, तर राऊतांच्या…”, हिंगोलीतील ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान
विनायक भिसे संतोष बांगर ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. सीमाप्रश्नावरून रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला होता.

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य केलं होतं. “संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल, तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्याठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संतोष बांगर यांनी दिला होता.

हेही वाचा : “कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कन्नडिगे अस्मितेला…”, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-भाजपा सरकारवर गंभीर आरोप

या इशाऱ्यानंतर हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी थेट संतोष बांगरांना आव्हान दिलं आहे. “संतोष बागरांनी संजय राऊतांबद्दल अपशब्द काढलं आहेत. संतोष बांगरांना सांगू इच्छितो, संजय राऊतांना हिंगोली जिल्ह्यात घेऊन येणार आहोत. आमदार बांगर यांच्यात हिंमत असेल, तर संजय राऊतांच्या अंगाला काय गाडीला हात लावून दाखवावा. मग त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,” असे विनायक भिसेंनी म्हटलं.

हेही वाचा : “…की थेट फाशी लावणार?” सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गुलाबराव पाटलांचा संतप्त सवाल

“निवडणूक लागूदे शिवसैनिक संतोष बांगरांना…”

संतोष बांगरांना शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. “संतोष बांगर आता संजय राऊतांना ठेचणार. जे संजय राऊत म्हणजे संतोष बांगर नव्हे. नुसतं ईडीची नोटीस गेल्यानंतर भाजपाला लोटांगण घातलं. संजय राऊत न झुकता जेलमध्ये गेले. साडेतीन महिने जेलमध्ये काढले पण झुकले नाहीत. संतोष बांगरांच्या तोंडी या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागूदे शिवसैनिक संतोष बांगरांना ठेचून काढतील. शिवसैनिक कमजोर नाही आम्ही बघून घेऊ,” असं सुनिल राऊत म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या