मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचा दौरा तीन तासातच उरकला गेला. काही ठिकाणी ते गाडीतून उतरले आणि काही ठिकाणी वातानुकूलित गाडीच्या काचेतूनच त्यांनी पिकांची पाहणी केली.  उणीपुरी ३० मिनिटे शेतकऱ्यांच्या वाटय़ाला आली. उस्मानाबादमधून सुरू झालेला हा दौरा लोहारा तालुक्यातील आरणी व कानेगाव वगळता अन्यत्र गाडय़ा आल्या आणि गाडय़ा गेल्या, याच पातळीवर राहिला.
जिल्ह्यात रब्बीचा केवळ ३३ टक्के पेरा झाला आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हातचा गेला. रब्बीच्या भरवशावर बसलेल्या उस्मानाबादकरांना आता भीषण दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कमी-अधिक  प्रमाणात पाणी, चाराटंचाई नोव्हेंबरमध्येच आ वासून उभी ठाकली आहे. त्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या १० आमदारांसह विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर ते शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या दौऱ्यास प्रत्यक्ष साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तत्पूर्वी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांचे सत्कार असे सोपस्कार झाले.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोहारा तालुक्यातील आरणी गावाच्या शिवारात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि काही शेतकरी वाट पाहत थांबले होते.  िशदे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची माळसुद्धा आणली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरून िशदे यांनी शेतकऱ्यांशी १० मिनिटे संवाद साधला. माध्यमांनाही १० मिनिटे मिळाली. नुकताच अवकाळी पावसामुळे नेत्यांच्या चप्पलला चिखल लागला. तो पुसून शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा कानेगावमध्ये आला. तेथेही शेतकऱ्यांसोबत १५-२० मिनिटे संवाद साधून िशदे थेट येथील मंदिरात जाऊन आले. पुढे ते गाडीतून खाली उतरले नाही.
सरकार आत्महत्यांची वाट पाहतेय काय ?
मराठवाडय़ात आतापर्यंत ३५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यंदा मराठवाडय़ातील स्थिती विदारक आहे. खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णत: हातातून गेला आहे. अनेक ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे चुकीची आकडेवारी शासनदरबारी दिली जात आहे. यात दुरुस्ती न झाल्यास पुढील काळात आत्महत्यांचे सत्र वाढेल. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहतेय काय, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे यांनी उपस्थित केला.
यावेळी खासदार रवींद्र गायकवाड, लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, आमदार रूपेश म्हात्रे, विजय शिवतारे, सदा सरवणकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, सुनील िशदे, ज्ञानराज चौगुले, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार ओम राजेिनबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील उपस्थित होते.