शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरून २०२४ लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सहा खासदारांनी आता बंडखोरी करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या सहा खासदारांना खासदार अरविंद सावंत यांनी पत्र पाठवून कायदेशीर इशारा दिला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचं कोणत्याही प्रकारचं विलीनीकरण होणार नसल्याचं अरविंद सावंतांनी स्पष्ट केलं असून या पत्राची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिलेली नाही
अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदार संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय जाधव आणि संजय देशमुख यांना हे पत्र पाठवले आहे. “शिवसेना (उद्धव ठाकरे) हाच मूळ राजकीय पक्ष असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षासोबत विलीनीकरणाला कोणतीही मंजुरी दिलेली नाही आणि तसा कोणता प्रस्तावही स्वीकारलेला नाही”, असं सावंत यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे.
“शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नाव आणि चिन्हावर तुम्ही निवडून आले आहात. तुम्हाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी तिकिट दिलं. तुमच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या नावाने तुम्हाला निवडून दिलं आहे. ज्या पक्षात आता तुम्ही गेला आहात, त्या पक्षातील उमेदवारांविरोधात तुम्ही निवडणूक लढला आहात. सार्वजनिकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही आणि तुमचे काही सहकारी मिळून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करत आहात. यासंदर्भात तुम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन या विलीनीकरणासंदर्भात चर्चाही केली आहे”, असं अरविंद सावंत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
“शिवसेना (उद्धव ठाकरे) हा मूळ पक्ष आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अशा प्रकारच्या कोणत्याही विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली नाही किंवा त्याला परवानगी दिलेली नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. मूळ पक्षाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही गटाला किंवा विलीनीकरणाला संसदेत मान्यता देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आले असून, पक्षाशी प्रतारणा करणे हा मतदारांचा अवमान आहे, असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
