“गेल्या १८ वर्षांपासून…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “बीकेसीतल्या सभेत मी..!”

उद्धव ठाकरे म्हणतात, “ठीक आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्षं…!”

uddhav thackeray mocks raj thackeray speech
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलताना केलेलं भाषण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच, शिवसेनेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केले गेल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंसोबत ओबेरॉयमध्ये झालेल्या भेटीचाही राज ठाकरेंनी यावेळी उल्लेख केला. मात्र, या सर्व टीकेला उद्धव ठाकरेंनी आता खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी पक्षप्रमुख पदाबाबत झालेल्या चर्चेचा प्रसंग यावेळी भाषणात सांगितला. “मला बाजूला सारण्याचा प्रयत्न होत होता हे मला कळत होतं. मी एकदा उद्धवकडे गेलो आणि त्याला म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. मी त्याला समोर बसवलं. मी त्याला विचारलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय, हो. पण फक्त मला सांग माझं काम काय आहे? मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नका. एरवी घरात ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही. पुढच्या वेळी प्रचाराला जायचं. काय तोंड दाखवू त्यांना. मला उद्धव म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“तिथून आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. म्हणाले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो. हे सगळं बोलणं झालं. सगळं मिटलं. त्यांनी मला मिठी मारली. मला म्हणाले उद्धवला बोलव. मी बोलावणं पाठवलं तर म्हणे येतायत. बाळासाहेब अधीर झाले होते. थोड्या वेळाने म्हणाले कुठे आहे उद्धव. मी परत बाहेर गेलो, तर मला तिकडे सांगितलं की ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालल्या होत्या की मी बाहेर कधी जातोय. त्रास देऊन ही माणसं बाहेर कशी टाकता येतील”, असा दावा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला होता.

“मी एकदा उद्धवला म्हणालो की चल…”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “बाळासाहेबांना मी सांगितलं..!”

उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

दरम्यान, आज उद्धव ठाकरे विधानभवनात आले असता माध्यमांनी त्यांना राज ठाकरेंच्या आरोपांविषयी विचारणा केली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या आरोपावर खोचक टोला लगावला. “गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी त्या चित्रपटाचा उल्लेख मात्र केला नाही.

माहीमच्या समुद्रातील बांधकामावर कारवाई…

यावेळी राज ठाकरेंनी माहीमच्या समुद्रात बांधकाम करण्यात आलेल्या मजारचा मुद्दा आपल्या भाषणात घेतला होता. त्यावर आज सकाळी पालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्याच्या आधीही तिथे इतर पक्षांचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाचे आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं.”

Mahim Mazar : “राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करायचं असल्यानेच भाजपाने हे…” इम्तियाज जलील यांचा आरोप

“ठीक आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्षं कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होत असेल तर मग राज्यात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:06 IST
Next Story
“राज ठाकरेंनी नारायण राणेंबाबत सांगितलं ते वास्तवच! उद्धव ठाकरे बाळासाहेबांना धमक्या..” नितेश राणेंचा आरोप
Exit mobile version