उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होणार आहेत. कारण दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली आहे. सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ९ पैकी ६ खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जातो आहे. या प्रकरणी आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार यांनीही एक सविस्तर पोस्ट लिहून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट काय?

लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..??? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.

#शिवसेना #OperationBazaar

#राजकीय_व्यभिचार #संविधान #लोकशाही अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे आणि टीका एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

सहा खासदाचांचा कार अन् चार्टर्ड विमानाने प्रवास

६ खासदार दिल्लीला नेमकं कसे पोहोचले? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, या सहापैकी एका खासदाराने हैदराबादपर्यंत कारने प्रवास केला. त्यानंतर तेथून विमानाने दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची चर्चा आहे. तसेच दोन खासदारांनी स्वतंत्रपणे नांदेड विमानतळावरून चार्टर्ड विमानाने उड्डाण करून दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची चर्चा आहे. तसेच एका खासदाराने मुंबईवरून दिल्लीला विमानाने प्रवास केल्याचं बोललं जात आहे, तर आणखी एका खासदाराने शिर्डीवरून थेट दिल्लीला विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त मनी कट्रोलने दिलं आहे. एका वृत्तानुसार, या खासदारांनी दिल्लीला जाताना एकत्र प्रवास करणं टाळलं आहे, म्हणजे एकत्र दिल्लीला न जाता वेगवेगळ्या मार्गांनी ते दिल्लीत पोहोचले आहेत. तसेच दिल्लीपर्यंतच्या प्रवासाबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

“ऑपरेशन टायगरशी भाजपाचा संबंध नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरबाबत भारतीय जनता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत ‘ऑपरेशन टायगर’वरील चर्चांबाबत प्रतिक्रिया देत महत्वाचा खुलासा केला आहे. बावनकुळे यांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र, भारतीय जनता पक्षाचा या ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. त्यामुळे या ‘ऑपरेशन टायगर’शी आमच्या नेत्यांना काही बोलणं योग्य नाही. ज्या विषयाशी संबंधित आम्हाला काहीही माहिती नाही, त्यामुळे त्याबाबत आम्हाला काही बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, याबाबत कोणाचीही ना नाही. ज्यांनी-त्यांनी आप-आपल्या पक्षाचा निर्णय घ्यायचे असतात. आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे लोक का सोडून चालले? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. मात्र, या विषयाशी तथा ऑपरेशन टायगरशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही”, असं बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक आरोप केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या खूनाचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल लवकरच येणार आहे. हा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर आमच्या पक्षात या, अशी ऑफर ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. काल रात्री मला १०.३० ते ११ वाजता महत्त्वाच्या व्यक्तीने मला फोन केला. तो म्हणाला की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतले जात आहे. मी त्याला विचारले भाव काय आहे. तो म्हणाला तोच ५० कोटी रुपयांचा हमीभाव आहे. यापैकी १५ कोटी आज रात्री दिले जाणार आहेत. त्याशिवाय हे खासदार विमानात बसायला तयार नव्हते. अशाप्रकारे पक्ष फोडले जात असतील तर देशात निवडणूक लढण्याला अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.