विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडली आणि तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं तुफान राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंनी सोडली जात नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये शिक्षण मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी रान उठवलं होतं. यासंदर्भात आज घनसावंगीत भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

सुप्रिया सुळेंबाबत अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली होती. ‘सुप्रिया सुळेंनी तुमच्याकडे खोके आले असतील, म्हणून तु्म्ही खोके देण्याची ऑफर करताय असं म्हटलंय. त्यावर काय सांगाल?’ अशी विचारणा करताच त्यावर बोलताना “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

“त्याला आत्तापर्यंत मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे होतं”

दरम्यान, या वक्तव्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांनी माता-भगिनींचा मान राखायला शिकवलं, पण त्यांच्याच महाराष्ट्रात एका महिलेचा अपमान करणारा मंत्री अजूनही मंत्रीमंडळात आहे. तुम्ही काय आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार? जर मी त्या ठिकाणी असतो ना… आणि होतो तेव्हा एका मंत्र्याला मी काढून टाकलं होतं. नाहीतर काय अर्थ आहे? फक्त भाषणं द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि इथे महिलेचा अपमान केला, तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. अजिबात नाही चालणार. त्याला आत्तापर्यंत मंत्रिमंडळातून काढून टाकायला पाहिजे होतं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘समृद्धी’चं उद्घाटन करताना मोदी आम्हालाही टोमणे मारतील, पण…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!

“महाराजांची शिकवण जोपर्यंत आपण अंमलात आणणार नसू, तोपर्यंत ती वाचण्याचीही गरज नाही मग. असे राज्यकर्ते बघितल्यानंतर मला वाटतं की पुन्हा एकदा अमृतमहोत्सवाच्या ७५व्या वर्षात असताना थांबून मागे बघायला पाहिजे की जे स्वातंत्र्य आपण मिळवलं, ते खरंच टिकवलं आहे का?” असंही ते म्हणाले.

शिंदे गटाला केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. “बरं झालं, ज्ञानेश्वर आत्ता नाहीयेत. त्यावेळी वेद बोलणारा रेडा होता. आत्ताचे रेडे वेगळे आहेत. हे वेद वगैरे बोलणार नाहीत, फक्त खोका खोका बोलतील. बाकी काही बोलणार नाहीत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली. “आत्ता विचारांचं दारिद्र्य असलेले जे राज्यकर्ते विद्यापीठांसाठी भीक मागायला सांगत आहेत, ते तुम्हाला पसंत असतील, तर हे सगळं फुकट गेलं. नसतील तर ते घालवायचे कसे, त्याचा निश्चय करा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray targets cm eknath shinde abdul sattar controversy pmw
First published on: 10-12-2022 at 14:24 IST