scorecardresearch

“देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्रे धुण्याचे काम…”, शिवसेनेचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ‘दिल्लीतील सूचनां’चा उल्लेख!

‘कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा…’

“देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्रे धुण्याचे काम…”, शिवसेनेचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ‘दिल्लीतील सूचनां’चा उल्लेख!
ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये रोज गोंधळ पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली जात नसताना सरकारकडूनही त्यावर जोरकसपणे बाजू मांडली जात आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

नागपूरमधील एनआयटी भूखंड घोटाळा, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झालेला घोटाळा यांची सध्या चर्चा सुरू आहे. नागपुरात येऊन राजकीय बॉम्ब फोडण्याचं विधान संजय राऊतांनी केल्यानंतर विरोधकांनी केलेले आरोप लवंगी फटाकेही वाटले नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरून दोन्ही बाजूंनी टोलेबाजीला सुरुवात झाली आहे. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीकास्र सोडण्यात आलं आहे.

‘…तर तो फडणवीसांचा राजकीय कर्णदोष’

देवेंद्र फडणवीसांनी लवंगी फटाकाही वाटत नसल्याच्या केलेल्या विधानाचा समाचार अग्रलेखातून घेण्यात आला आहे. ‘फडणवीसांनी सांगितले की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही’. फडणवीसांचं हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली करावी लागते. विधानसभेत विरोधकांकडून रोज भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फोडले जात आहेत. फडणवीस यांना ते ऐकू जात नसतील तर तो त्यांचा राजकीय कर्णदोष म्हणावा लागेल’, असा टोला लागावण्यात आला आहे.

सीमावादावर महाराष्ट्राकडून अधिवेशनात ठराव संमत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘विरोधकांनी फोडलेला हा बॉम्ब लवंगी फटाक्याच्याही तोडीचा नाही, असे वाटणे हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. फडणवीस हे कोणत्या जादूटोण्याच्या दबावाखाली काम करीत आहेत? की विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध फोडलेले बॉम्ब त्यांना अस्वस्थ करीत नाहीत’, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

‘शे-पाचशे कोटींचा गैरव्यवहार म्हणजे चिल्लर?’

‘फडणवीसांचा इशारा असा आहे की, महाराष्ट्राने आता प्रगती केली असून शे-पाचशे कोटींचा गैरव्यवहार म्हणजे चिल्लर आहे. यापेक्षा काही मोठा घोटाळा असेल तर बोला! आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असेच फडणवीस यांना सांगायचे आहे काय? संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत व ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्रे धुण्याचे काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना करावे लागत आहे”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

‘या जादूटोण्यास काय म्हणावे, फडणवीसांना काहीच..’

‘विधानसभेत भ्रष्टाचारविरोधी हंगामा सुरू आहे. सरकारातील मंत्री रोज नवे भूखंड पचवून ढेकर देत आहेत व फडणवीस या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहेत. सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही ते म्हणतात कुठे काय मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही या जादूटोण्यास काय म्हणावे? नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे पण फडणवीसांना काहीच दिसत नाही ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय?” अशा शब्दांत अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यात आले आहे.

“१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

‘कदाचित फडणवीसांना अशा सूचना दिल्लीहून..’

‘इतके गंभीर प्रकरणही फडणवीस यांना विचलित करत नसेल तर त्यांची संस्कृती व संस्कार बदलले आहेत व भ्रष्टाचाराची प्रकरणे ते गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा हा परिणाम असावा’, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 08:03 IST

संबंधित बातम्या