विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त, एकीसोबत लग्न करुन संसार केला अन् दुसरीसोबत पवईला राहतात; पत्नीचा दावा

“विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे”

Shivsena, Vijay Shivtare, Vijay Shivtare Admitted in Hospital, Vijay Shivtare Daughter Facebook Post, Vijay Shivtare property dispute, Mamata Lande Shivtare, Mamata Shivtare, Mandakini Shivtare, Vinay Shivtare, Vinas Shivtare
"विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे"

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून यावेळी त्यांच्या मुलीने फेसबुक पोस्ट करत आपल्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या भावांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी वडिलांची ही अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान मुलीच्या आरोपाला त्यांची आई आणि विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी उत्तर दिलं आहे. मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारेच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह करत सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर विजय शिवतारे दुसऱ्या एका महिलेसोबत राहत असल्याचंही सांगितलं आहे.

विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका, भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

“गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत,” असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी काय म्हटलं –

“मी मंदाकिनी विजय शिवतारे बोलत आहे. काही वेळापूर्वी माझी मुलगी डॉक्टर ममता शिवदीप लांडेने केलेली पोस्ट मी वाचली. सदर पोस्टमध्ये तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मिनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे”.

ममता लांडे-शिवतारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं आहे –

भावांकडून संपत्तीच्या लोभापायी दयनीय अवस्था

“आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठं कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. अशा माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

विनय शिवतारेकडून बदनाम करण्याचा प्रयत्न

“मागील काही दिवसात फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं,” असं त्या म्हणाल्या आहेत.

सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास

“मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

“आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!,” असं त्यांनी म्हटलं आहे.

उपस्थित केलेले प्रश्न

काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा.
१)१९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?
३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
४)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?
५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्युशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivsena vijay shivtare wife mandakini shivtare facebook liver over allegations of daughter mamata lande shivtare sgy