जुलैमध्ये भूकंप होणार, शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून येत्या जुलै महिन्यात शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कारण शिवसेना भाजपच्या विरोधात आंदोलन करणार आहे. ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात ते सरकार काय कामाचे? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

shivsena, mp sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत (संग्रहित छायाचित्र)

ज्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचे? असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर  टीकेची तोफ डागली आहे. गेल्या तीन वर्षात साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यातला लढा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते. आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबत आहे.. पण आरेला कारे म्हटलेच पाहिजे असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप, शिवसेनेला संपवण्यासाठी चाली खेळते आहे, मात्र तसे होणार नाही. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत. असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच समृद्धी महामार्गावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः ओरबाडल्या जात आहेत. मात्र समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही हा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेला कर्जमाफी नकोय तर सरसकट कर्जमुक्ती हवी आहे त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसंदर्भात जी उच्चाधिकार समिती नेमली आहे त्यात दिवाकर रावते सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होऊन ते शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडणार आहेत असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे आंदोलन कर होणार आहे. समृद्धी महामार्ग होणार नाही ही उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही लढायचे आणि श्रेय इतरांनी घ्यायचे अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण प्रसिद्धीत कमी पडतो आहोत. तसे चालणार नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही संजय राऊत यांनी झापले आहे. नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे किती पदाधिकारी होते? तुम्ही पदाधिकारी म्हणून मिरवता आहात का? या प्रश्नाचे उत्तरही उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी ठेवा असेही संजय राऊत सेना पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले आहे. एकंदरीतच स्थिती पाहता येत्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादाचा नवा अंक बघायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivsena will ready to strike bjp on farmer issue