सातारा: स्वारगेटवरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला शहराच्या हद्दीत वाढे फाटा परिसरात टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला. दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा >>> मनोज जरांगे यांच्या विरोधात बार्शीत मराठा समाजाचे आंदोलन

पुणे-बेंगलोर महामार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. सांगली आगाराची शिवशाही बस स्वारगेटवरून सकाळी साडेनऊच्या सुमारास निघाली. बस साताऱ्यात वाढे फाटा परिसरात आली असता मागील टायर अचानक फुटून मोठा आवाज झाला. गाडी पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवासी तातडीने बस बाहेर उतरत असताना अचानक डाव्या बाजूने गाडीने पेट घेतला. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस, तसेच सातारा तालुका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचा संपूर्ण पत्रा जळून काळा पडला होता. सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यामध्ये आणली. या वेळी महामार्ग परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. शहरभर लांबून आगीचे लोळ दिसून येत होते.