जितेश अंतापूरकर यांच्याकडून तीन वेळा आमदार राहिलेले साबणे पराभूत

नांदेड : देगलूर (राखीव) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नवखे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. पक्षाची ही जागा राखताना त्यांनी भाजप उमेदवार व तीन वेळा आमदार राहिलेले सुभाष साबणे यांना पराभूत केले.

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या पोटनिवडणुकीत गेल्या शनिवारी मतदान झाल्यानंतर विजयाबद्दल काँग्रेससह भाजपनेही दावा केला होता; पण मंगळवारी सकाळी देगलूर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर टपाली मतांच्या मोजणीपासूनच साबणे मागे पडल्याचे दिसले. ही पिछाडी शेवटच्या, ३०व्या फेरीच्या मोजणीपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपला जिल्यातील प्रभाव दाखवून दिला. वंचित आघाडीसह इतर उमेदवारांची धुळदाण उडाली. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. २०१९ मध्ये अंतापूरकर सुमारे २३ हजार मतांनी निवडून आले होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा जवळपास दुप्पट मताधिक्याने विजयी झाल्यामुळे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर व त्यांच्या चमूला मोठा तडाखा बसला. साबणे यांची उमेदवारी चिखलीकर यांनी लादली म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्ष सोडून काँग्रेसमध्ये म्हणजे स्वगृही प्रवेश केला होता, त्याचा या पक्षाला मोठा लाभ झाला. २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या देगलूर मतदार संघात जितेश यांनी मताधिक्याच्या बाबतीत नव्या विक्रमाची नोंद करत वडिलांच्या जागी विधानसभेमध्ये प्रवेश मिळवला आहे.

 भाजपच्या पराभवाचे खापर खासदार चिखलीकर व त्यांच्या चमूवर फोडले जात आहे. निकालानंतर भाजपकडून चिखलीकरांसह एकाही आमदाराने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र यावर गंभीर चिंतन होण्याची गरज निष्ठावंतांनी व्यक्त केली आहे.

विकासाच्या मुद्द्याच्या बाजूने कौल…राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे, हे देगलूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले. सामूहिक प्रयत्नांना विजयाचे फळ आले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व राज्याचे ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी सायंकाळी येथे व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देगलूरच्या विजयाबद्दल अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले. या पोटनिवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेत्यांना प्रचारात उतरविले तरी देगलूरच्या जनतेने आम्ही मांडलेल्या विकासाच्या मुद्द्याच्या बाजूने कौल दिला, असे चव्हाण यांनी नमूद केले.