बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल ३२ वर्षे शिक्षकाची नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. आश्चर्य म्हणजे प्रदीर्घ काळ नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर संबंधितावर फौजदारी कारवाई झाल्यामुळे शिक्षण खात्याचा बेफिकिरीचा कारभारही उघडा पडला आहे.

आमसिध्द भिकप्पा बिराजदार (वय ५८, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे फौजदारी कारवाई झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शासकीय-निमशासकीय नोकरी लागल्यानंतर संबंधित अधिकारी वा कर्मचा-यांच्या शैक्षणिक पात्रतेसह अन्य सर्व प्रमाणपत्रांची व इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यात बनावटगिरी आढळून आल्यास संबंधिताची नोकरी तर जातेच, शिवाय तात्काळ फौजदारी कारवाईही होते. परंतु सोलापुरातील या प्रकरणात बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल ३२ वर्षे शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर झालेली कारवाईमुळे शिक्षण विभागाचा गलथान कारभार उघड झाल्याने आश्चर्य तथा संताप व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण संचालक व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आमसिध्द बिराजदार याने १९८८ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली होती. त्यासाठी त्यांनी १९८४ साली मुंबईच्या एस. के. सोमय्या ज्युनियर काॕलेज आॕफ एज्युकेशन येथून डी. एडची पदविका प्राप्त केल्याचे दर्शवून तसेच प्रमाणपत्र व गुणपत्रिका सादर केली होती. त्या आधारे १९८८ साली शिक्षकाची नोकरी लागल्यानंतर पुढे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या बनावटगिरीबद्दल शिक्षण खात्याकडे तक्रारी आल्या. परंतु त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बिराजदार यांच्या शिक्षकी नोकरीला अजिबात धक्का बसला नाही.

वास्तविक पाहता बिराजदार यांच्या १९८४ सालच्या डी. एड प्रमाणपत्रावर संबंधित सोमय्या शिक्षण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील या नावाची सही आहे. प्रत्यक्षात १९८२ ते १९८४ या काळात त्याठिकाणी प्राचार्य पाटील नव्हे तर कांताबेन आशर नावाच्या प्राचार्या होत्या. प्रमाणपत्रावरील क्रमांकही खोटा होता. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे ज्या महाविद्यालयातून डी. एड उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बिराजदार यांनी सादर केले होते, ते महिला महाविद्यालय असल्याचेही चौकशीत आढळून आले आहे. हे खोटे आणि बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून आणि त्याचा वापर करून बिराजदार यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी मिळविली आणि तब्बल ३२ वर्षे नोकरी करून वेतन, भत्ते व अन्य लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. अलिकडे आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जि. प. शाळेत प्रभारी मुख्याध्यापकाचा भार सांभाळून ते निवृत्त झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर तालुका प्रभारी गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात आमसिध्द बिराजदार यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.