वसई-विरारमध्ये उपचार खाटांचा तुटवडा

विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णाची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी मोठी कसोटी ठरत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आणि प्राणवायूच्या तुटवड्याने शहरात खाजगी तथा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध नाही आहेत. यामुळे अनेकांना घरीच अलगीकरणात राहावे लागत आहे. सध्या पालिका परिसरात ४१३२ रुग्ण घरीच अलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती पालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यापासून करोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला ७०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना उपचारांसाठी रुग्णांना शासकीय तथा खाजगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा रुग्णांना रुग्णवाहिकेतून भटकंती करावी लागत आहे. यामुळे अनेक रुग्ण घरीच स्वत:ला अलगीकरणात ठेवून उपचार घेत आहेत. सध्या पालिकेच्या आकडेवारीनुसार ४ हजार १३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

घरी अलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पालिका या रुग्णावर करडी नजर ठेवून आहे. दिवसातून तीन वेळा पालिकेच्या आरोग्य सेवकांकडून या रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच त्यांच्यावर औषध उपचार केले जात असून त्यांची परिस्थिती खालावली त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरविल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सुरेखा वाळके यांनी दिली.