भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त येथे मंगळवारी सकाळी शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन सकल जैन सोशल ग्रुपतर्फे करण्यात आले असल्याची माहिती जैन सेवा संघाचे जयेश शहा व जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हर्षवर्धन गांधी यांनी दिली.
२३ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता दहीपुलापासून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. जुनी तांबट लेन, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधी रोड, मेहेर चौक, अशोकस्तंभ, रविवार पेठमार्गे रविवार कारंजावरील वर्धमान जैन स्थानक येथे १०.३० वाजता शोभायात्रेचा समारोप होईल. आचार्य राजहंससूरश्वर, उपप्रवर्तक श्रुत मुनीजी, अक्षर मुनीजी, उपाध्याय मयंक सागरजी महाराज हे संत ‘भगवान महावीर व अिहसा’ या विषयावर रविवार कारंजा येथील श्री जैन स्थानकात सकाळी ११ वाजता प्रवचन देणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नलाल बाफना व अंबालाल नहार हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, प्राप्तीकर आयुक्त आर. के. जैन, विक्रीकरचे सहआयुक्त सुरेशकुमार काला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक बाबुलाल बंब हे उपस्थित राहणार आहेत. भगवान महावीर जनकल्याणक महोत्सवानिमित्ताने आरोग्य शिबीर, व्याख्यानमाला, बालधर्मसंस्कार शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जैन सेवा संघाच्या वतीने देण्यात आली.