जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आता टोकास पोहोचल्याने प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण झाला असून चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील शीतयुध्दाने आता टोकाचे वळण घेतले आहे. कर्मचारी नेत्यांनी तर काही अधिकाऱ्यांविरोधात मोहीमच उघडल्याने प्रशासन ठप्प झाल्याची स्थिती आहे. प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात झाल्यानंतर धुसफू स वाढली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वेळेत कामावर हजर होत नसल्याने लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. तसेच काही कर्मचारी हे नागरिकांशी उद्दाम वागत असल्याचेही गाऱ्हाणे होते. या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आल्यावर कर्मचारी नेते संतापले. त्यातूनच उपजिल्हाधिकारीपदाच्या एका अधिकाऱ्यास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला. पालकमंत्री तसेच मंत्रालयीन पातळीवर तक्रारी झाल्यानंतर या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली, पण आपल्याविरुध्द नाहक कांगावा केला जातो. कर्मचाऱ्यांना शिस्तीचा आग्रह धरला म्हणून बदनामी केली जात आहे, असे मत मांडून मॅटकडे धाव घेणाऱ्या या अधिकाऱ्याच्या बदलीस शेवटी स्थगिती देण्यात आली. मात्र, बदनामी झाली म्हणून हा अधिकारी आता कर्मचारी नेत्यांविरुध्द अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.
हे प्रकरण आता एवढय़ावरच थांबले नाही. एक कर्मचारी नेता आता रोज जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून संबंधित अधिकाऱ्याविरुध्द तक्रारी करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करीत असल्याचा आरोप हा अधिकारी करीत आहे. काही कर्मचाऱ्यांनी मात्र याचा चांगलाच फोयदा घेणे सुरू केले आहे. माहिती न देणे, नागरिकांच्या तक्रारी न स्वीकारणे, उद्याम वागणूक, अशा बाबींचा क हरच झाल्याचे दिसून येत आहे. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना नोटिस देण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी यास दुजोरा दिला. मात्र, कर्मचारी नेते हरीभाऊ लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांवरील सर्व आरोप मोडून काढले. काही विशिष्ट अधिकाऱ्यांबाबतच आमची तक्रार आहे. कर्मचारी संघटनेने अधिकाऱ्यांवर चुकीचा दबाव आणल्याचा आजवरचा इतिहास नाही. कर्मचाऱ्यांना रात्री-बेरात्री फ ोन करणे, बदल्याचा धाक दाखविणे, कर्मचाऱ्यांमध्ये फू ट पाडणे, असे प्रकार अधिकाऱ्यांकडून होत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुध्द तक्रारी करणारच. कर्मचारी चुकीचे वागणे तर आम्हीसुध्दा पाठिशी घालणार नाही, असे प्रतिपादन लोखंडे यांनी केले.
कर्मचारी व अधिकारी यांच्या वादात मात्र प्रशासन ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या नोंदी सांगायला किंवा खुलासा करायला संबंधित कर्मचारी तयार नाही. सुटीच्या दिवशी कशाला विचारणा करतात, असा उद्याम प्रश्नही ऐकायला मिळतो. जिल्हाधिकारी नविन सोना यांच्याशी वारंवार संपर्क करूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.