काँग्रेस आणि सीजेपीच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. जे काही देशात चाललं आहे त्यामागे एक व्यवस्थित षडयंत्र दिसून येतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच संविधानाने चालणाऱ्या संस्थांचं अवमूल्यन करण्याचा विरोधकांचा डाव आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संविधान दाखवून आंदोलन करायचं आणि…

काँग्रेस असो किंवा कॉक्रोच जनता पार्टी असो ते संविधान हातात घेऊन, ते दाखवत आंदोलन करतात. आंदोलन कशासाठी करत आहेत तर संविधानाने तयार झालेल्या सगळ्या संस्था म्हणजे RBI, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग सगळ्या संस्था वाईट आहेत असं हे सांगतात. आता यामागे डिझाईन हे आहे की या सगळ्या संविधानाने चालणाऱ्या संस्थांचं अवमूल्यन करणं, मग सांगायचं की संविधानाने तयार केलेल्या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकणार नाहीत. मग संविधानाने तुम्हाला न्याय मिळणार नाही. अशा पद्धतीने संविधान दाखवूनच संविधानाच्या विरोधात षडयंत्र चाललं आहे. एक अल्ट्रा लेफ्टिस्ट व्यवस्था या लोकांना आणायची आहे. कुठल्याही तर्काशिवाय हे बोलत आहेत. कुणी तर्क मांडत तथ्य मांडली तर टीका करायची, ट्रोल करायचं असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोकशाही मानणारा आपला देश आहे, चर्चा करूनच अनेक प्रश्न सुटतात-फडणवीस

लोकशाही मानणारा देश त्यात प्रत्येकाशी चर्चा केली जाऊ शकते. आम्ही तर अल्ट्रा लेफ्टिस्ट असणारे जे नक्षलवादी होते त्यांच्याशीही आम्ही चर्चा केली आहे. लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटतात, समस्या सुटतात. नक्षल्यांची भूमिका पटते म्हणून आम्ही चर्चा करत नाही. उलट त्यांची समजूत घालून त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आता नीटचा पेपर फुटला ही बाब चुकीचीच आहे त्याला कुणीही पाठिंबा देत नाही. त्यानंतर सरकारने नीटची पुनर्परीक्षा घेतली. ती परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. त्यानंतर सीजेपीचे कार्यकर्ते जंतर-मंतरला जमा झाले, त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तुम्हाला राजीनामा मागण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण पंतप्रधानांना घाणेरड्या शिव्या देणं, शिवाय अशा गोष्टी तिथे घडत होत्या त्या असह्य करणाऱ्या होत्या. त्याला अराजकता म्हणतात. तुम्ही उपोषण करणं हे अराजक नाही. पण त्या ठिकाणी २ हजार लोक असे होते ज्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत याला अराजकता माजवणं म्हणतात असंही फडणवीस म्हणाले.

माझी जी स्तुती केली गेली त्यामुळे मी हुरळून जात नाही-फडणवीस

यानंतर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला की अनेक आंदोलकांनी तुमची स्तुती केली. ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे मृदू हृदयी आहेत. त्यांनी आम्हाला आंदोलन करू दिलं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा गोष्टी कॉमन आहेत. ते माझी स्तुती करणारच कारण त्यांना माझ्या वरच्या लोकांना शिव्या द्यायच्या आहेत. त्यामुळे मी अशा गोष्टींनी हुरळून जात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी मनापासून स्तुती केली असती तर मी त्यांना थँक्यूही म्हटलं असतं, पण त्यामागचं डिझाईन मला ठाऊक आहे, त्यामुळे मी हुरळून गेलो नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.