Shraddha Jadhav and Kishori Pednekar on Ritu Tawade Mumbai Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात मराठी महापौराचा मुद्दा गाजला होता. भाजपा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून मुंबईत कोणत्या भाषेचा महापौर होईल यावरून कलगीतुरा रंगला होता. आता, भाजपाने महापौर पदासाठी मराठी चेहरा दिल्याने आता गेल्या काही दिवसांपासून महापौर निवडीबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यावरून मुंबईच्या शिवसेनेच्या माजी महापौर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी महापौराचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उचलून धरला
मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे यांचं नाव निश्चित झालं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे आता रितू तावडे यांच्या निवडीमुळे मराठी हे हिंदू आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. जर मराठी महापौर असतील आम्ही अपशकुन करणार नाही. मराठी महापौर असायला हवं एवढंच आमचं म्हणणं होतं, ते त्यांनी मान्य आहे”, असं माजी महापौर श्रद्धा जाधव म्हणाल्या. त्या पुढे विरोधी पक्षाबाबत म्हणाल्या, “आमचा सक्षम विरोधी पक्ष असेल. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. तत्वांविरोधात जाऊन तडजोड करणार नाही. आकडे समोर असल्याने घाबरण्याचा प्रश्नच येत नाही.”
तसंच, “दोन नंबरचा पक्ष म्हणून शिवसेनेला मुंबईकरांनी निवडून आणलं आहे. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पक्ष खिळखिळा केलेला असतानाही मुंबईकरांनी शिवसेनेला मतदान केलं”, असंही त्या म्हणाल्या.
आकड्यांची गणितं आम्हाला मान्य, अपशकून करणार नाही
“अखेर भाजपाला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागलं. २०२२ नंतर जी लढाई सुरू होती त्या लढाईमध्ये भले ८३ चे ८९ झाले तरीही मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर मुंबईत मँडेट मिळालं आहे. आमची लढाई मराठीच्या अस्मितेसाठी होती. मराठी अस्मितेसाठीच कायम काम करत आलोय, पुढेही करत राहू. मुंबईत मराठी महापौर दिलाय, त्यामुळे आम्ही अपशकून करणार नाही. त्यामुळे आकड्यांची गणितं आम्हाला मान्य असतात. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. सत्तेत असताना विरोधी पक्षाच्या भूमिका बजावाव्या लागल्या आहेत, मग आता विरोधात असतानाही नीट नीटके, कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता काम करू”, असं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

