सोलापूर : भक्तांकडून पाहुणचार घेण्यासाठी लाडक्या गणरायाचे शनिवारी घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक मंडळांनी लेझीम, ढोल-ताशा, झांज, टिपऱ्यांच्या मिरवणुकांनी वाजतगाजत श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शहरात ठिकठिकाणी १३५० मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. या निमित्ताने संपूर्ण शहरात गणेशमय वातावरण बनले आहे.

सोलापुरात गणेशमूर्ती घडविणाऱ्या शिल्पकारांची संख्या मोठी आहे. विशेषतः पूर्व भागात शिल्पकारांनी सहा महिन्यांपासून श्री गणरायाच्या लहान-मोठ्या सुबक आकाराच्या मूर्ती घडविल्या आहेत. दोन फुटांपासून ते २० फुटांपर्यंतच्या मूर्ती कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी प्रांतातही पाठविल्या जातात. यंदा अशा हजारो मूर्ती परप्रांतात पाठविण्यात आल्या आहेत. विविध १४ ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची विक्रीदालने होती. मधला मारुती, टिळक चौक, कन्ना चौक, अशोक चौक, जुळे सोलापूर, विजापूर रोड परिसर व अन्य ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी काल शुक्रवारी सायंकाळपासून गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये जास्त गर्दी होती. पूजेचे साहित्य खरेदीसाठी मधला मारुती परिसराला नागरिकांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते. मूर्तिकारांकडून किमतीची घासाघीस करीत खरेदी केलेल्या श्रींच्या मूर्ती तेवढ्याच जल्लोषी वातावरणात घरी आणताना आबालवृद्धांचे चेहरे आनंदाने ओथंबले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सर्वत्र सुरू होता. शहरात सार्वजनिक मध्यवर्ती मंडळासह लोकमान्य संयुक्त महामंडळ, पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळ, लष्कर विभाग मध्यवर्ती मंडळ, विजापूर रोड परिसर मध्यवर्ती मंडळ, विडी घरकुल परिसर मध्यवर्ती मंडळ आदी प्रमुख मध्यवर्ती मंडळाच्या अधिपत्याखाली सुमारे १३५० सार्वजनिक मंडळांनी श्री गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. बाळी वेशीतील कसबा गणपती मंडळाच्या श्री प्रतिष्ठापनेची मिरवणूक सकाळी उत्साहाने निघाली. शेकडो खेळाडूंचा सहभाग असलेले लेझीम पथक लक्षवेधी होते. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. पत्रा तालीम गणेशोत्सव मंडळ, सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ व अन्य मंडळांच्या वाजत गाजत मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकांनी बहुसंख्य रस्ते फुलून गेले होते.

हेही वाचा – कोणाला पाडायचे – विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले – लक्ष्मण हाके

हेही वाचा – जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

देशात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या (स्थापना सन १८८५) मानाच्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना माणिक चौकातील मंदिरात विधिवत करण्यात आली. थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना सायंकाळी उत्साहाने झाली. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना पत्रा तालीम येथे झाली. पूर्व विभाग मंडळाच्या ताता (आजोबा) गणपतीची प्रतिष्ठापना साखरपेठेत भक्तिभावाने करण्यात आली. मानाच्या देशमुखांच्या गणपतीची प्रतिष्ठापना दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात पूर्वापार परंपरेने झाली.