अहिल्यानगर: प्रसिद्ध रेखाचित्रकार, अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर कलात्मक रेखाचित्र साकारणारे श्रीधर अंबादास अंभोरे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे जालना येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. जालना येथेच त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीधर अंभोरे अविवाहित होते.
बिनचेहऱ्यांची कष्टकरी, वंचित माणसे विशेषतः महिला असे विषय रेखाटून त्या व्यक्तीरेखा जिवंत साकारणे आणि निसर्गातील विविध घटकांची मानवी स्वभावामध्ये आणि मानवी स्वभावातील वैशिष्ट्यांची निसर्गातील घटकांमध्ये एकरूपता शोधणारी त्यांची शैली होती. लेखक व नाटककार विजय तेंडुलकर यांनी श्रीधर अंभोरे यांचे जीवन व रेखापट यावर आधारित दूरदर्शनवर ‘दिंडी’ हा माहितीपट तयार केला. लेखक महावीर जोंधळे यांनी अंभोरे यांच्या जीवनावर ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक तर जालना येथील उर्मी या त्रैमासिकाने विशेषांक प्रसिद्ध केला आहे.
मूळचे विदर्भातील अकोले जिल्ह्यातील चिखली गावचे असलेले श्रीधर अंभोरे टपाल खात्यातील नोकरीनिमित्त नगर शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले. गेली ४० वर्षांहून अधिक काळ ते नगरच्या साहित्य परिवाराचे अविभाज्य भाग बनले होते. करोनानंतर ते जालना येथे त्यांच्या भावाकडे राहण्यास गेले होते. तेथेच त्यांचे आजारपणात उपचार सुरू असताना निधन झाले.
दीड वर्षांपूर्वी श्रीधर अंभोरे यांच्या रेखाचित्रांचे अखेरचे प्रदर्शन भरवले गेले. तत्पूर्वी त्यांना कलाक्षेत्रतील योगदानाबद्दल ‘फाय फाउंडेशन’ तर अलिकडच्या काळात विखे साहित्य सेवा पुरस्कारासह इतर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डॉ. अरुणा ढेरे, डॉ. भालचंद्र नेमाडे, मारुती चितमपल्ली, डॉ. आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे अशा अनेक लेखकांबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते यातील अनेकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी अंभोरे यांनी रेखाचित्रे रेखाटली.
‘दिंडी’, ‘आदिम’ अशी अनियतकालिके अंभोरे यांनी दीर्घकाळ चालवली. त्यांच्या संपादक मंडळात त्यांचा समावेश होता. अनेक मासिकातूनही त्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध झाली. नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील रेखाचित्र त्यांनी एका रात्रीमध्ये रेखाटले होते. पु. ल. देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी नगरमध्ये बा. सी. मर्ढेकर व आरती प्रभू यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील रेखाचित्रही अंभोरे यांनीच साकारले होते. अंभोरे यांचे गौतम बुद्धावरील रेखाचित्र मालिकादेखील प्रसिद्ध आहे.
