श्रीगोंदा आगाराची दुरावस्था काही केल्या संपत नाही, असे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. अनेक वेळा या ठिकाणी एसटी बसेस ना दुरुस्त असतात. बाहेर गेलेल्या एसटी बस रस्त्यातच बंद पडतात. चालक वाहक यांची समस्या निर्माण होते. अशा पद्धतीने सातत्याने या एसटी आगाराविषयी प्रवाशांच्या तक्रारी असतात. अनेक एसटी बस सेवा अचानक रद्द करण्यात येतात. आणि या सर्व घटनांचा फटका मात्र प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने बसत आहे.
डिझेलअभावी आगार बंद
आज दिनांक सोमवार ७ ऑक्टोंबर रोजी या आगारामध्ये डिझेल शिल्लक नव्हते. यामुळे अनेक तास आगार बंद राहिले. अनेक ठिकाणच्या एसटी बसेस सेवा रद्द करण्यात आल्या. आणि यामुळे प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे आणि खासकरून मोठ्या प्रमाणामध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे चांगलेच हाल झाले. या संदर्भात वाहतूक नियंत्रक द्वारकानाथ लोखंडे यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. सकाळीपासून बंद असलेले एसटी आगार तब्बल दुपारी चार वाजता डिझेल आल्यानंतर सुरळीत सुरू झाले. मात्र या कालावधीमध्ये दिवसभरातील ५० ते ६० एसटी बस या रद्द झाल्या, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आगाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा – जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
आठवडे बाजार व नवरात्र असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये एसटी बससाठी गर्दी होती. विद्यार्थी एसटी बसची तासंतास वाट पाहत होते. तर आठवडे बाजारासाठी तालुक्याच्या गावाला येण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक महिला नागरिक एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. अखेर खाजगी वाहतुकीला जास्त पैसे देऊन त्यांना यावे लागले. आज पाचवी माळ नवरात्र उत्सव सुरू आहे यामुळे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा देखील एसटी बस सेवा बंद पडल्यामुळे हिरमोड झाला. अनेकांना देवदर्शन रद्द करावे लागले.
कार्यकर्त्यांचे गेट बंद करून आंदोलन
दरम्यान एसटी बसेस डिझेलअभावी बंद आहेत अशी माहिती मिळताच श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सतीश बोरुडे त्यांचे अनेक सहकार कार्यकर्त्यांनी एसटी डेपोमध्ये येऊन विचारणा केली असता डिझेल संपले आहे. यामुळे एसटी बसेस बंद आहेत, अशी माहिती मिळताच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी एसटी आगाराचे थेट गेट बंद करून कार्यालयाबाहेरच आंदोलन केले. यावेळी या संपूर्ण घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी केली.