महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापल्याबद्दल श्रीहरी अणेंची दिलगिरी

कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपण माफी मागतो

shrihari aney, cake
अणे यांनी या केकमधून विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग वेगळे करून आपला जन्मदिवस साजरा केला.

जन्मदिनी महाराष्ट्राच्या प्रतिकृतीचा केक कापून त्यातून विदर्भाचा हिस्सा वेगळा करण्याच्या अॅड. श्रीहरी अणे यांच्या कृतीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर अणे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपल्या कृतीमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपण माफी मागतो, असे सांगत अणे यांनी या प्रकारावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गेल्या महिन्यात १३ तारखेला अणे यांचा वाढदिवस होता. नागपूरमधील रविभवनात मध्यरात्रीनंतर एका कौटुंबिक सोहळ्यात तो साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे वकील मित्र, व्ही-कनेक्ट या संघटनेचे पदाधिकारी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात अणे यांनी कापलेल्या केक मुळे हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला होता. केकची प्रतिकृती महाराष्ट्राच्या आकाराची होती, त्यावर मराठवाडा आणि विदर्भ असे वेगवेगळे भाग दर्शविण्यात आले होते. अणे यांनी या केकमधून विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग वेगळे करून आपला जन्मदिवस साजरा केला. मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध करताना महाराष्ट्र म्हणजे केक वाटला काय? की ज्याचे हवे तितके तुकडे करावे? असा सवाल करीत महाराष्ट्राचे चार तुकडे करा, अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत मा.गो वैद्य यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अ‍ॅड. अणे यांनी केक कापूनच प्रत्युत्तर दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shrihari aney regrets his move to cut maharashtra cake