विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी अकोल्यात आयोजित करण्यात आलेली विदर्भ राज्य परिषद शिवसैनिकांनी उधळण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असलेले विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे कार्यक्रमस्थळी पोहोचताच शिवसैनिकांनी नारेबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस संरक्षणात पुढील कार्यक्रम पार
पडला.
अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात दुपारी १२ वाजतापासून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अ‍ॅड. श्रीहरी अणे दुपारी ४ वाजताच्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर त्याठिकाणी उपस्थित २० ते २५ शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू केली.
शिवसैनिकांनी सभागृहात शिरून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी गोंधळ घालत असलेल्या शिवसैनिकांवर लाठीमार केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोंधळ घातलेल्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांची व शिवसैनिकांची समजूत घातली. पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केल्याप्रकरणी आ. बाजोरिया यांनी पोलिसांना जाब विचारून त्यांना खडसावले. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस संरक्षणात अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य परिषदेत मार्गदर्शन केले.

शिवसैनिकांवर झालेला लाठीमार हा अत्यंत निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करतो. शिवसेना व शिवसैनिक महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही.
– गोपीकिशन बाजोरिया , शिवसेना आमदार