उद्या (रविवार, ९ जून रोजी) पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कुणाची वर्णी लागेल, याबाबत सर्वांचा उत्सूकता लागली आहे. तसेच शिंदे गटालाही एक मंत्रीपद मिळाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाच्या कोट्यातील या मंत्रीपदसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांचे नावही चर्चेत आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी तशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्रीपदाच्या या चर्चेबाबत आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या शुभेच्छा फलकांनी कल्याण, डोंबिवली शहरांचे विद्रुपीकरण; प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फलक न काढण्यासाठी दमदाटी

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

“ ”काही खासदार आणि आमदारांनी मला मंत्री करा अशी मागणी केली आहे. मात्र, मला पक्ष संघटना वाढवण्यात रस आहे. गेल्या १० वर्षांचा कामाचा अनुभव माझ्या पाठिशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मला गटनेत्याची जबाबदारी दिली आहे. मला मंत्रीपदात कोणताही रस नाही. मंत्रीपद हे मेरिटनुसार दिलं जाईल. मुख्यमंत्री जो आदेश देईल, त्यानुसार ती व्यक्ती मंत्री होईल, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.

“मला पक्ष संघटनेचं काम करण्यात रस”

“मला पक्ष संघटनेचं काम तळागाळात पोहोचवण्यात जास्त रस आहे. येणाऱ्या काळात मला ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी काम करायचे आहे. मी तिसऱ्यांदा खासदार झालो आहे. लोकांना तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला आहे. याचं मला समाधान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला स्वत: मंत्रीपदाबाबत विचारलं तर मी त्यांना नकार देईल”, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी

“विधानसभेत आम्हाला चांगले यश मिळेल”

पुढे बोलताना, “गेल्या दोन वर्षांत शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. शिवसेनेचं जे १९ टक्के मतदान आहे, त्यापैकी १४ टक्के मतदान हे आमच्या बाजुने आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलं, त्यांना केवळ साडेचार टक्के मतं मिळाली आहे. येणाऱ्या काळात हे मतदानदेखील आमच्या बाजुने होईल आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.